आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथकापाठोपाठ मंत्री पंकजा मुंडेंनीही केली पाहणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर -लातुरात दुष्काळ असताना येथे येऊन स्थानिकांच्या समस्या समजावून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी टंचाई आढावा बैठक घेण्याऐवजी लातूरच्या अधिकाऱ्यांनाच मुंबईत बोलावून बैठक घेणाऱ्या पालकमंत्री पंकजा मुंडेंनी अखेर पाच महिन्यांनंतर लातूर गाठले. केंद्राने दुष्काळाच्या पाहणीसाठी पथक पाठवल्याचा योग साधून बुधवारी सकाळी पालकमंत्री तातडीने लातूरमध्ये आल्या. सकाळी साडेआठ वाजता पथक पुढच्या दौऱ्यासाठी निघाले असता पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्याशी पाच मिनिटे संवाद साधला. आपणही तुमच्यासोबत दौऱ्यात येत असल्याचे सांगून त्यांनी पथकाला पुढे निघण्यास सांगितले. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन त्या पथकापाठोपाठ दुष्काळ पाहणीसाठी रवाना झाल्या.
रस्त्यात जागोजागी थांबलेल्या कार्यकर्त्यांना भेटत त्या खानापूर येथे पोहोचल्या. पथक प्रमुख राघवेंद्र सिंग पाहणी करून परत निघाले असतानाच पालकमंत्री तेथे पोहोचल्या. एकच मिनिट बोलून पथकाने औरंगाबादची वाट धरली. पंकजा मुंडेंनीही मग रस्त्याच्या खाली उतरून पाच मिनिटे शेतकऱ्यांशी संवाद साधला. तेथे माध्यम प्रतिनिधींशी बोलून त्या नियोजित कार्यक्रमांसाठी अंबाजोगाई-परळीकडे रवाना झाल्या. लातुरात दुष्काळी स्थिती असताना आणि लातूर शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यानंतर त्यांनी लातूरमध्ये येऊन आढावा बैठक घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी चार दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून आढावा बैठक घेतली. त्याला आमदारांचीही उपस्थिती नव्हती. या प्रकारावर टीका झाली. दैनिक दिव्य मराठीने "टंचाई लातुरात आणि बैठक मुंबईत' या शीर्षकाखाली याचे वृत्तही दिले. त्यानंतर पंकजा मुडेंनी तातडीने बुधवारी सकाळी रेल्वेने लातूर गाठले. दुष्काळी पाहणी पथकापाठोपाठ त्याही पाहणीसाठी गेल्या.