आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pankaja Munde News In Marathi, BJP, Divya Marathi

मुंडे यांचे परळी-नगर रेल्वे मार्गाचे स्वप्न साकार करण्यासाठी पकंजाने घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - ऊसतोडणी मजूर, कष्टकरी जनतेचा सर्वांगीण विकास साधण्याला दळणवळणाचे प्रमुख साधन असलेली रेल्वे आल्यास बळकटी मिळेल, यासाठी नगर- बीड- परळी रेल्वे सुरू करण्यासाठी माजी दिवंगत खासदार केशरकाकू क्षीरसागर यांनी लोकचळवळ हाती घेतली. सत्तेतील कॉँग्रेस पक्षाच्या खासदार म्हणून दिल्लीकरांशी लढा देऊन मंजुरी मिळविली. काम सुरू झाल्यानंतर खासदार गोपीनाथ मुंडे यांच्याकडे अनेकांच्या नजरा वळल्या; परंतु केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर आठव्या दिवशी जगाचा निरोप घ्यावा लागलेले गोपीनाथ मुंडे यांचे अधुरे कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांची कन्या पंकजा मुंडे यांनी लढा हाती घेतला आहे.

बीड जिल्ह्याच्या राजकारणात 1975-80 च्या सुमारास भल्याभल्यांना धडा शिकवून अस्तित्व सिद्ध करू पाहणा-या केशरकाकू क्षीरसागर या एकमेव खासदार ठरल्या. बीड जिल्ह्याचे दिल्लीत प्रतिनिधित्व करणा-या अल्पशिक्षित केशरकाकूंनी बीडच्या विकासाचा ध्यास मात्र कायम धरला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात त्यांनी बीडला रेल्वे द्या ! ही मागणी लावून धरली. बीड जिल्ह्यातून आमदार, लोकप्रतिनिधींचे दोनशे- तीनशे लोकांचे शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. केवळ शिष्टमंडळ नेऊनच त्या थांबल्या नाहीत तर नगर- बीड - परळी लोहमार्गाला त्यांनी मंजुरी मिळवूनच घेतली. सुरुवातीला चारशे कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आज तीन हजार कोटींवर पोहोचला आहे. या मार्गाला मंजुरी मिळण्यासाठी केशरकाकू क्षीरसागर यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडे सातत्त्याने पाठपुरावा केला. पंतप्रधानांकडे मागणी लावून धरतानाच तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, तत्कालीन रेल्वेमंत्री अब्दुल गफूर, गनीखान चौधरी, सी. के. जाफर शरीफ यांच्याकडे सारखा पाठपुरावा करत सर्वेक्षण व मार्ग मंजूर करून घेतला. मंजुरी मिळताच बीडमध्ये राज्यातील व केंद्रातील नेते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत रेल्वेच्या कामाचे उद्घाटनही केले. दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पाअगोदर निधीची तरतूद करण्यास सरकारला भाग पाडले. त्यांच्यानंतर रजनीताई पाटील, जयसिंगराव गायकवाड यांनीही जुजबी प्रयत्न केले.

त्यानंतर मात्र सगळ्यांच्या नजरा वळल्या, त्या राष्ट्रीय नेतृत्व म्हणून शिक्कामोर्तब होऊ लागलेले गोपीनाथ मुंडे यांच्याकडे. 2009 मध्ये गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा खासदार झाले; मात्र केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्याने त्यांना फारसे काही करता आले नाही. 2014 च्या निवडणुकीत मुंडे खासदार झाले आणि केंद्रातही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली स्वबळावर सरकार आले. गोपीनाथ मुंडे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री झाले. परंतु बीड जिल्ह्याचे नशीबच फाटले ! अवघ्या आठ दिवसांत मुंडेंचे अपघाती निधन झाले. त्यांची कन्या आमदार पंकजा मुंडे यांना मुंडेंची जागा पक्षाने दिली. राज्याचे नेतृत्व मिळालेल्या पंकजा मुंडे आता बीडला रेल्वे येण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू लागल्या आहेत. त्यांनी मंगळवारी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन तरतूद करण्याची मागणी केली.


रेल्वेमंत्र्यांकडे केलेल्या मागण्या
पंकजा मुंडे यांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले. नगर- परळी मार्गासाठी भरीव तरतूद करावी, गेल्या अर्थसंकल्पात मंजूर झालेली मुंबई - लातूर- नांदेड गाडी परळीमार्गे सुरू करावी, अशा मागण्या केल्या. यावर गौडा यांनी पुरवणी अर्थसंकल्पात जादा निधी देण्याचे मान्य केले.