बीड - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषद सदस्य धनंजय मुंडे यांच्याशी सलोखा करण्याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे अथवा माझ्याकडे प्रस्तावच आलेला नाही. आमच्या वाटा वेगवेगळ्या असल्यामुळे आम्ही दोघे राजकीयदृष्ट्या पुन्हा एकत्र येणे शक्य नाही, असे भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
पंकजा म्हणाल्या, दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जागी मुंडे कुटुंबातील एका सदस्याने केंद्रात जावे. मुंडे कुटुंबीयांपैकी कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही पोटनिवडणूक लढवणार नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याआधीच जाहीर केले आहे. मुंडे कुटुंबातील सदस्यांनीच लोकसभा आणि विधानसभा निवडणूकदेखील लढवावी, असा आग्रह आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेऊ. प्रदेश भाजपच्या नेत्यांनी मला कोअर कमिटीत स्थान मिळण्यापूर्वीच बाबांच्या जागी मला केंद्रात स्थान मिळावे, अशी शिफारस पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. मी पक्षाकडे वा पंतप्रधानांकडे काहीही मागितलेले नाही. पक्षश्रेष्ठींचा निर्णय मला मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतून होईल जागावाटपाचा निर्णय
आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात भाजप, शिवसेनेची मुंबईत बैठक होईल. घटक पक्षांना किती जागा द्यायच्या याविषयी सर्व मित्रपक्षांशी चर्चा करून समाधानकारक निर्णय होईल. राज्यात सामोपचाराने चर्चा झाल्यास काही प्रश्नच नाही अन्यथा दिल्लीतूनच निर्णय होईल, असे पंकजा यांनी स्पष्ट केले.