आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर बडगा उगारणार, पंकजा मुंडे यांचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खते, बियाणे कमी पडू नयेत म्हणून सरकारकडून उपाययोजना करण्यात येत असून शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी दिला.

खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुंडे बोलत होत्या. या वेळी खासदार प्रीतम मुंडे, आमदार सुधाकर भालेराव, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना एक लाखापर्यंतचे विनातारण कर्ज देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे स्पष्ट करत मुंडे म्हणाल्या, दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना खरिपाची पेरणी करण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत. त्यानुसार ३० एप्रिलपर्यंत कर्ज पुनर्गठनाची प्रक्रिया पूर्ण करून ३१ मेपर्यंत कर्जाचे वाटप करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. परिणामी पेरणीसाठी शेतकऱ्यांना वेळेवर पैसा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्याला खरीप हंगामासाठी लागणारे खत आणि बियाण्यांचा आढावा घेण्यात आला असून शेतकऱ्यांना आणखी जास्तीची मदत देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे मंुडे यांनी या वेळी स्पष्ट केले. सातत्याने पाऊस कमी होत असल्याने नैसर्गिकरीत्याच उसाचे प्रमाण कमी होत असून पाण्याची उपलब्धता बघून शेतकऱ्यांनी अन्य पर्याय निवडणे आवश्यक आहे.

प्रशासनाचे कौतुक
लातूरला मिरजेहून पाणी येत आहे. परंतु पाणी साठवून घेण्यासाठी लागणारी यंत्रणा उभी राहण्यासाठी १५ ते २० दिवस लागले असते. पण स्थानिक प्रशासनाने अवघ्या चार ते पाच दिवसांत सर्व व्यवस्था केली. त्यामुळे प्रशासनाचाही त्यात मोठा वाटा असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.
मी तसे बोललेच नाही
औरंगाबादेतील मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पाणीपुरवठा करण्यात गैर काय? असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी शनिवारी केले होते. त्यावर रविवारी त्या म्हणाल्या, मी तसे बोललेच नाही. आपल्या बोलण्याचा विपर्यास करून बातमी देण्यात आली. मी मराठवाड्याची कन्या असून मला शेतकऱ्यांच्या दु:खाची जाणीव आहे. त्यामुळे मी अशी असंवेदनशील भूमिका कशी घेईन? असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला.