आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज प्रश्न: थर्मलला वाणची ‘ऊर्जा’, परळीतील वीजनिर्मिती केंद्र होणार सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी वैजनाथ- सबंध महाराष्ट्राला उजेड देणारे परळी वैजनाथ येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्र केवळ पाण्याअभावी बंद करण्याची नामुष्की पंधरा दिवसांपूर्वी आली. यातून मार्ग काढत जलसंपदा विभागाने वाण धरणातून थर्मलला पाणी देण्यास शुक्रवारी तत्त्वत: मान्यता दिल्याने या वीज केंद्रास जीवदान मिळणार आहे.
खडका बंधाºयात पाणीसाठा शिल्लक नसल्याने परळी येथील वीजनिर्मिती केंद्र सतरा फेब्रुवारीपासून बंद करण्यात आले आहे. यासंदर्भात दैनिक ‘दिव्य मराठी’ने 19 फेब्रुवारीला ‘नियोजनाअभावी थर्मलची बत्ती गुल !’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. या संशोधनात्मक वृत्ताची दखल घेण्यात आली आहे.
माजलगाव आणि पैठणच्या धरणात पाणीसाठा शिल्लक नसल्याने परळीचे वीजनिर्मिती केंद्र बंद करण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला होता, परंतु परळी येथून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नागापूरच्या वाण धरणात सुमारे 16.50 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. परळी येथील तीन संच चालवण्यासाठी दरमहा केवळ एक दशलक्ष घनमीटर पाणी लागते. ही बाब ‘दिव्य मराठी’ने सप्रमाण प्रसिद्ध केली होती. त्यानंतर जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींनी ही मागणी लावून धरली. गेवराईचे विधान परिषद सदस्य अमरसिंह पंडित यांनी मुद्दा लावून धरला.
शुक्रवारी औरंगाबादेत विभागीय आयुक्तांनी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली. बैठकीत तालुक्यातील तीन मध्यम व दहा लघु प्रकल्पांत 37 दशलक्ष घनमीटर पाणी असल्याचा अहवाल बैठकीत समोर आला. नागापूर येथील वाण धरणात 16.50 दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यातून परळी शहरासाठी 2.36 दशलक्ष घनमीटर, तर वैद्यनाथ साखर कारखान्याला 0.84 दशलक्ष घनमीटर पाणी लागते. वीजनिर्मिती केंद्र जूनअखेरपर्यंत चालवण्यासाठी केवळ चार दशलक्ष घनमीटर एवढे पाणी लागणार आहे. वाण धरणातून वीजनिर्मिती केंद्रापर्यंत पाणी आणण्याला जलवाहिनीदेखील आहे. तीच जलवाहिनी दुरुस्त करून वाण धरणातून पाणी घेऊन वीजनिर्मिती केंद्र चालू करण्यास जलसंपदा विभागाने तत्त्वत: मान्यता दिली आहे.

"जलसंपदा विभागाने वाण धरणातून पाणी घेण्यास तत्त्वत: मान्यता दिलेली आहे; परंतु यासंबंधीचा निर्णय हा जिल्हाधिकार्‍यांच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहत आहोत. पाणी घेण्यास परवानगी मिळाल्यास जुनी जलवाहिनी दुरुस्त करून पाणी घ्यावे लागेल. त्यास वेळ लागू शकतो.''
-एम. एम. चव्हाण,मुख्य अभियंता, औष्णिक वीजनिर्मिती केंद्र, परळी.

"परळी तालुक्यात वाणसह इतर धरणांत मुबलक पाणीसाठा आहे. तालुक्यातील पाण्याचा उपयोग व्हावा ही आमची इच्छा आहे. पाण्याचा उपयोग शेती किंवा उद्योगासाठी झाला पाहिजे. वाण धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती केंद्र चार महिने चालवूनही पाणी शिल्लक राहू शकते; परंतु वीजनिर्मिती केंद्र कसे व कधी पाणी उचलते, यावर बरेच काही अवलंबून आहे.''
-आर. बी. करपे, मुख्य अभियंता,माजलगाव पाटबंधारे विभाग, परळी