आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी विद्यापीठ प्रशासनाने लगेचच त्या जागेवर नांगरही फिरवला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या जागेच्या परस्पर करून दिलेल्या बनावट रजिस्ट्रीनंतर महापालिकेनेही ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर गेल्या तीन ते चार वर्षांपासून उभारली गेलेली 20 ते 22 घरांची अतिक्रमणे काढण्यात आली. मंगळवारी (दि.10) सकाळी ७ वाजता पोलिस बंदोबस्तात अतिक्रमित घरे जमीनदोस्त करण्यात आली. विद्यापीठ प्रशासनाने लगेचच त्या जागेवर नांगरही फिरवला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मालकीची गंगाखेड रस्त्यावरील साखला प्लॉट या वसाहतीपर्यंत जागा आहे. राज्य वीज वितरण कंपनीने 33 केव्ही सबस्टेशनसाठी या साखला प्लॉटजवळील जागेची मागणी 2006-07 मध्ये विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. विद्यापीठाच्या ठरावानंतर त्यातील एक एकर जागा विद्यापीठाने सबस्टेशनच्या उभारणीसाठी कंपनीला दिली. कंपनीने त्यातील काही गुंठे जमिनीवर सबस्टेशन उभारल्यानंतर काही जागा मोकळीच राहिली. या मोकळ्या जागेवर मागील चार वर्षात अतिक्रमणे वाढली. चांगली पक्की घरेच त्यावर बांधली गेली. विद्यापीठाला ती जागा वीज कंपनीला दिल्याचे तर वीज कंपनीला ती जागा विद्यापीठाकडे असल्याचे भासले. दोघांच्या या गैरसमजुतीचा काही दलाल मंडळींनी फायदा घेत या जागेचा बोगस सर्व्हे नंबरही तयार केला. त्याआधारे एक लाख रुपयांपर्यंतचे प्लॉटही बनावट रजिस्ट्रीच्या आधारे विकले. नागरिकांनी त्यावर बांधकाम करीत महापालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन वीजपुरवठाही घेतला.

जागेवरील अतिक्रमणाची बाब विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ऑक्टोबर 2013 मध्ये संबंधितांना नोटिसा बजावल्या. याप्रकरणी विद्यापीठाने दावा दाखल केल्यानंतर ती जागा विद्यापीठाचीच असल्याचे सिद्ध झाल्याने प्रशासनाने या अतिक्रमणकर्त्यांवर कारवाईची अंतिम नोटीस दिली. काही नागरिकांनी आपली अतिक्रमणे काढून घेतली. सोमवारी (दि.10) सकाळीच कोतवाली पोलिसांच्या बंदोबस्तात प्रशासनाने अन्य घरे पाडून लगेचच ती जमीनही नांगरून घेतली. या वेळी सहायक पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांच्यासह विद्यापीठ प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.