आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
परभणी - मराठवाडा कृषी विद्यापीठाने वृक्ष लागवड व संवर्धन मोहिमेअंतर्गत विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर एक लाख झाडांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे. विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार जयप्रकाश दांडेगावकर व आमदार हरिदास भदे यांच्या हस्ते सोमवारी उद्यानविद्या विभाग व कोरडवाहू संशोधन केंद्राच्या परिसरात वृक्ष लावून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
मागील वर्षीच मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत काही प्रक्षेत्रावर व परिसरात वृक्षारोपण करण्यात आले होते. यावर्षी वृक्षलागवड व संवर्धन मोहिमेची व्याप्ती वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. केवळ वृक्षलागवड करणे हा या मोहिमेचा उद्देश नसून या वृक्षांचे संगोपन करण्यासाठी उपलब्ध जलस्त्रोतांचा विचार करून नियोजनबद्ध उपाययोजनाही करण्यात येणार आहेत. कुलगुरू डॉ. के. पी. गोरे यांच्या पुढाकाराने ही मोहीम विद्यापीठ प्रशासन राबवणार आहे.
सात जिल्ह्यांत लागवड मराठवाड्यातील विद्यापीठांतर्गत परभणी, औरंगाबाद, बदनापूर, अंबाजोगाई, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, तुळजापूर, खामगाव इत्यादी ठिकाणची (20) संशोधन केंद्रे, (11) घटक महाविद्यालये, (9) कृषितंत्र विद्यालये व तीन कृषी विज्ञान केंद्रे आदी परिसरात ही महत्त्वाकांक्षी मोहीम राबवली जाणार आहे. तसेच विद्यापीठांतर्गत खासगी महाविद्यालये व कृषितंत्र विद्यालये यांनाही वृक्ष लागवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
संवर्धन समितीचे गठन - विद्यापीठ स्तरावर वृक्ष लागवड व संवर्धन समितीचे गठन करण्यात आले आहे. या मोहिमेचे अध्यक्ष विस्तार संचालक डॉ. अशोक ढवण असून उद्यानविद्या विभागाचे विभागप्रमुख डॉ. तुकाराम तांबे समितीचे सदस्य सचिव आहेत. शिक्षण संचालक डॉ. विश्वास शिंदे व संशोधन संचालक डॉ. जी. आर. मोरे यांच्या नेतृत्वाखाली विविध महाविद्यालये, संशोधन केंद्रे, विविध विभाग येथील प्राचार्य, विद्यापीठाचे इतर अधिकारी व कर्मचारी या मोहिमेसाठी परिश्रम घेत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.