परभणी - मोबाइलवरून बँक ग्राहकास त्याचा एटीएमचा पासवर्ड विचारून अवघ्या काही वेळातच इंटरनेटद्वारे त्या खात्यावरून 12 हजार पाचशे रुपये लांबवण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सोनपेठ पोलिस ठाण्यात शनिवारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
सोनपेठ येथील ब्राह्मण गल्लीतील कृष्णा शिवाजीराव पिंगळे यांना 20 जून रोजी सकाळी साडेअकरा ते सव्वाबाराच्या दरम्यान एका मोबाइलवरून चौकशीसाठी फोन आला. समोरील व्यक्तीने त्यांच्या एटीएम कार्डचा पासवर्ड विचारून घेतला. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या इंडिया बँकेच्या खात्यावरून 12 हजार पाचशे रुपये इंटरनेटद्वारे काढून घेण्यात आले.
ही बाब पिंगळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ज्या मोबाइल क्रमांकावरून फोन आला होता त्या क्रमांकाच्या आधारे सोनपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.