आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक आत्महत्याप्रकरणी पोलिस निरीक्षकाची बदली, गुन्हा दाखल करण्यासाठी डीआयजींकडे धाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - शहरातील गांधी विद्यालयातील प्रभाकर काशीनाथ पवार- झोडगावकर या शिक्षकाच्या आत्महत्या प्रकरणात त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटच्या आधारे नातेवाइकांनी पोलिसांवर केलेल्या आरोपानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनी नवा मोंढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधाकर जगताप यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात पवार यांच्या मुलीला पळवून नेल्याच्या कारणावरून त्या दोघा युवकांसह मुलीचा तपास व गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई करणाऱ्या व शिक्षक पवार यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पोलिस निरीक्षक सुधाकर जगताप, जमादार राजेश राठोड यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यासाठी पवार यांच्या कुटुंबीयांनी रविवारी (दि.तीन) नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांच्याकडे धाव घेतली.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरातील शेंद्रा फार्म परिसरात शिक्षक प्रभाकर पवार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांनी सुसाइड नोटमध्ये मुलीला पळवून नेणाऱ्या शिवा चव्हाण व महेश जाधव या दोन युवकांवर तक्रार दाखल करण्यास गेलो असताना पोलिसांनी शिवीगाळ करून अपमानस्पद वागणूक दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्या दोन युवकांसह पोलिस निरीक्षक व जमादारदेखील मृत्यूस कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. ही नोट त्यांच्या नातेवाइकांनी पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांच्याकडे सादर केली. युवकांसह पोलिस अधिकारी जगताप व जमादार राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. त्यावर पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनी यासंदर्भात त्यांच्या नातेवाइकांना गुन्हा दाखल करण्यात येईल व पोलिसांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते.