आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parbhani Hit Heavy Waves, Lowest Temperature Recorded

परभणी गारठले, वर्षांतील सर्वात नीचांकी तापमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - मागील ११ वर्षांत परभणी जिल्ह्याचे तापमान प्रथमच नीचांकी पातळीवर गुरुवारी (दि. १८) नोंदवले गेले. केवळ ३.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याने संपूर्ण जिल्हा थंडीच्या लाटेने गारठून गेला आहे. मागील ३५ वर्षांत २००३ मध्ये २.८ अंश सेल्सियस सर्वांत विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद झाली होती.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागात गुरुवारी नोंदवलेले तापमान मागील ११ वर्षांत प्रथमच किमान पातळीवर आले आहे. या वर्षी पावसाची अनियमितता असताना व वार्षिक सरासरीच्या केवळ ४४ टक्के पाऊस झालेला असल्यामुळे नोव्हेंबरमध्ये हिवाळा नसल्याचीच जाणीव होत होती. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच थंडी पडण्यास सुरुवात झाली. सात डिसेंबर रोजी प्रथमच पारा ७.६ अंशांवर आला. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात झालेल्या अवकाळी पावसाने वातावरण ढगाळ राहून थंडीत वाढ झाली. उत्तर भारतात आलेली हिमवृष्टी हेदेखील यामागील प्रमुख कारण कृषी हवामानशास्त्र विभागाने नमूद केले आहे. १२ डिसेंबरपासून हा पारा आठ अंशांच्या आसपास स्थिरावला. त्यानंतर बुधवारी (दि. १७) किमान तापमान ८.३ अंशांवर राहिले. याच थंडीने नागरिक गारठून गेले होते. त्यात गुरुवारी आणखीच भर पडून तापमान केवळ ३.६ अंश सेल्सियसवर आल्याने, तर संपूर्ण जिल्हाच थंडीने गारठून गेला आहे.

गव्हासाठी पोषक वाढती थंडी ही गव्हासाठी पोषक आहे. मागील आठवड्यात थंडी असली, तरी ती ढगाळ वातावरणासह होती. त्यामुळे तिचा उपयोग गव्हासाठी पोषक नव्हता; परंतु दोन दिवसांत तापमान घसरले असले तरी ढगाळ वातावरण नसल्याने ही थंडी गव्हासाठी पोषक ठरणार आहे.

कृषी विद्यापीठ परिसरात ओलिताची शेती
परभणी कृषी विद्यापीठाच्या आवारात ओलिताची शेती आहे. या क्षेत्रातच त्यांचे तापमापक असल्याने त्या ठिकाणचे तापमान कमी असण्याची शक्यता आहे. तापमान, पर्जन्यमानमापक यंत्रे आयएमडी (भारतीय हवामान खाते) च्या निकषानुसार लावलेली असावीत. नांदेडचे तापमान ९.३ से. असताना परभणीचे तापमान ३.६ एवढे कमी असण्याची शक्यता कमी आहे. शंभर किलोमीटरच्या परिक्षेत्रात जास्तीत जास्त एक ते दीड सें. फरक पडण्याची शक्यता असते. ६ से. चा फरक पडण्याची शक्यता अत्यंत कमी असते.
श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्र, नांदेड

तापमानातील भिन्नता
परभणीच्या हवामानशास्त्र विभागाने गुरुवारचे तापमान सर्वात निचांकी ३.६ अंश नोंदवले आहे, तर पुणे वेधशाळेने हे तापमान ८ अंशाच्या वर दर्शवले आहे. परभणीपासून ७८ किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंगोलीचे तापमानही १०.३ अंश सेल्सियस दाखवले गेल्याने तापमानाच्या नोंदीतील फरकाची भिन्नता समोर आली.

आयएमडीचे यंत्र सिमेंट काँक्रीटच्या परिसरात
परभणीत भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) असलेल्या मोजणी यंत्रानुसार ते तापमान बरोबर आहे. परंतु तेथे असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या इमारती व रस्त्याच्या डांबरीकरणामुळे ते तापमान जास्त दाखवले जाते. पुण्याच्या वेधशाळेने ते तापमान गृहीत धरले असावे. मात्र, विद्यापीठाची परिमाणेदेखील प्रमाणित आहेत. कृषी विद्यापीठातील मोकळी जागा, सिंचन, झाडे यामुळे शहराच्या अर्ध्याधिक भागात विद्यापीठाचे दर्शवलेले तापमान योग्य आहे. हिंगोलीतील तापमानातील फरक हा किलोमीटरच्या तुलनेत असू शकतो.''
ए. आर. शेख,
वेधशाळा निरीक्षक, कृषी हवामानशास्त्र विभाग, परभणी