आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parbhani Municipal Corporation Employee Issue News In Divyamarathi

परभणी मनपाचे स्वच्छता कामगार वेतनासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- महापालिकेतील स्वच्छता विभागातील कायम व रोजंदारी कर्मचारी मागील चार महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत असून या कर्मचाऱ्यांनी वेतनाच्या मागणीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांनी मनपा प्रशासनाकडे सोमवारी (दि. १७) मागण्या मांडताना संप व आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशाराही दिला आहे.

पालिकेच्या स्वच्छता विभागातील कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे. केवळ कायमच नव्हे, तर रोजंदारी कामगारांनादेखील वेतन मिळत नसल्याने त्यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कायम कामगारांचा तीन, तर रोजंदारी कामगारांचा चार महिन्यांचा पगार थकला आहे. परिणामी, या कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुलांचे शिक्षण व दैनंदिन गरज भागवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. वेतनाच्याच मागणीसाठी यापूर्वी केलेल्या संप काळातील वेतनही त्यांना मिळालेले नाही. उलट, काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. संप काळातील वेतन व निलंबित कामगारांना कामावर घेण्यासाठी कामगार संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्यालाही यश आले नाही. उलट, चार महिन्यांचे वेतन थकले आहे. या पार्श्वभूमीवर कामगार पुन्हा आंदोलन करण्याच्या मानसिकतेत आहेत, असे संघटनेच्या अध्यक्षा अनसूयाबाई जोगदंड, सचिव के. के. भारसाकळे यांनी म्हटले आहे.
कायम व रोजंदारी कामगारांचे सर्व थकीत वेतन देण्यात यावे, पगारातून कपात केलेली एलआयसी, बँक कर्ज व इतर कपात संबंधित खात्यावर तत्काळ जमा करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.