परभणी - महापालिकेच्या रमाई घरकुल योजनेतील लाभार्थींच्या प्रश्नावरून लाभार्थींनी मागील सात दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनानंतर भीमकायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी सोनकांबळे यांनी मंगळवारी (दि. पाच) सायंकाळी सहा वाजता योजनेचे प्रकल्प अधिकारी ए. सी. शेख यांच्याशी वाद घातला. शिवीगाळही केली. या प्रकारानंतर बुधवारी (दि. सहा) महापालिकेच्या कर्मचार्यांनी लेखणी बंद आंदोलन केले.
रमाई घरकुल योजनेअंतर्गत शासनाकडून प्राप्त झालेला निधी व आचारसंहितेचा कालावधी लक्षात घेता एका वर्षामध्ये योजनेअंतर्गत जवळपास सात कोटी 60 लाख रुपये एवढे अनुदान वितरित केले असून 456 लाभार्थींना योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी 200 लाभार्थींच्या घरांची कामे पूर्ण झालेली आहेत, असे प्रकल्प अधिकारी शेख यांनी म्हटले आहे. तरीदेखील भीमकायदाचे रवी सोनकांबळे व इतर काहींनी खोटे आरोप करून गुन्हे दाखल करावेत, म्हणून उपोषण सुरू केले आहे. यातूनच मंगळवारी आयुक्त अभय महाजन यांच्या दालनात काही कार्यकर्त्यांनी खोटी कामे करण्यासाठी अधिकारी व कर्मचार्यांना शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला आहे. त्यांचा बंदोबस्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही प्रकल्प अधिकारी ए. सी. शेख, करनिर्धारक बी. आर. शिंदे, एन. एस. कांबळे, एस. जे. डफुरे, एम. जे. मोरे, विलास संगेवार आदींनी केली आहे.
मनपा अधिकार्यांचे दबाव तंत्र
घरकुल योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी लाभार्थींनी मागील सात दिवसांपासून उपोषण सुरू केल्यानंतर प्रशासनाने अद्याप कोणतीच कार्यवाही केलेली नाही. उलट, मनपाचे अधिकारी उपोषणकर्त्यांना विसंगत पत्रव्यवहार करून उपोषण मागे घेण्यास दबाव टाकत आहेत. उपोषणकर्त्यांच्या विरोधात लेखणी बंद आंदोलन करत आहेत. भीमकायदा संघटनेने या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. - रवी सोनकांबळे
(फोटो : झुंडशाहीच्या विरोधात परभणी मनपा कर्मचार्यांनी लेखणी बंद आंदोलन केले)