आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी शिवसेनेत आमदार-खासदार यांच्यातील संघर्षाची परंपरा जुनीच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- २५ वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या परभणी जिल्ह्यात शिवसेनेचा खासदार व आमदार यांच्यातील संघर्षाची परंपरा कायमच असल्याचे चित्र खा. संजय ऊर्फ बंडू जाधव व आ. डॉ. राहुल पाटील यांच्यात थेट रस्त्यावर उद््भवलेल्या संघर्षाने अधिकच गडद केली. दोनच दिवसांनंतर मुंबईत मातोश्रीवर या दोघांना पाचारण करण्यात येऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर झालेली दिलजमाई कायम राहील का, असा प्रश्न  शिवसैनिकांना पडला आहे.    
एकेकाळी शेकाप, काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या परभणी जिल्ह्यात १९८८ पासून शिवसेनेचा उदय झाला. उदयाच्या काळातच शिवसेनेच्या धनुष्यबाणाने विजयश्री संपादन करून शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देण्याचा मान या जिल्ह्याने मिळवला. साहजिकच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे या जिल्ह्यावरील प्रेम अखेरपर्यंत अबाधितच होते. त्यांच्या सभेला जमलेल्या जनसमुदायाची आकडेवारी उच्चांक प्रस्थापित करणारी ठरायची. त्यातून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला ग्रामीण भागातील कार्यकर्ता शिवसेनेशी एकनिष्ठ झाला. त्यातून आमदार, खासदार घडले. पक्ष संघटन वाढत गेले. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासारख्या मुंबईहून आलेल्या नेत्यांनी येथील कार्यकर्ता पक्ष संघटनेशी जोडला. पक्षाचा वटवृक्ष होत असताना  गट-तटांचे राजकारण सुरू झाले.    

प्रामुख्याने खासदार व आमदार संघर्ष हा सातत्याने उफाळून आलेला आहे. माजी खासदार सुरेश जाधव व  तेव्हाचे आमदार तुकाराम रेंगे पाटील, तत्कालीन खासदार तुकाराम रेंगे पाटील व आ. बंडू जाधव व त्यानंतर तत्कालीन खासदार गणेशराव दुधगावकर व तत्कालीन आमदार बंडू जाधव यांच्यातील संघर्ष कार्यकर्त्यांना ठाऊक आहे. यातील वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळी खासदार झाल्यानंतर तो नेता पुन्हा खासदार झाला नाही. दुसऱ्या पक्षात डेरेदाखल झाला. सुरेश जाधव, तुकाराम रेंगे पाटील असो की गणेशराव दुधगावकर व त्यापूर्वीही सुरुवातीचे उदाहरण म्हणजे  दिवंगत अशोक देशमुख ही सर्वच मंडळी  दुसऱ्या पक्षात दाखल झाली. त्यातही खासदाराने पक्ष सोडल्यानंतर आमदार हाच खासदार झाला आहे हे सर्वांवरून दिसून येते.    
आ. पाटील विधानसभा निवडणुकीच्या २ वर्षे आधी जिल्ह्यात दाखल झाले. युवा सेनेचे सर्वेसर्वा आदित्य ठाकरे यांच्याशी संबंधित असलेले युवा नेते आणि सर्व अर्थांनी सक्षम म्हणून डॉ. पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे.

दोघांतील संघर्षात कार्यकर्ते संभ्रमात
शिवसेनेत एकदा खासदार झाल्यानंतर पुन्हा खासदार होणे नाही या पंक्तीला आगामी २०१९ च्या निवडणुकीत छेद बसेल, अशी अपेक्षा खा. बंडू जाधव यांच्याकडून सर्वांनाच आहे. या सर्व अपेक्षांची पूर्ती त्यांच्याकडून होईल, असे अपेक्षित असताना मागील दोन वर्षांपासून त्यांचा व आ. डॉ. राहुल पाटील यांच्यात सुरू झालेला संघर्ष कार्यकर्त्यांना संभ्रमात पाडणारा  आहे. 
बातम्या आणखी आहेत...