आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातपंचायत उरकल्यानंतर पारधी समाजातील महिलेचा संशयास्पद मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूम - पारधी समाजातील एक महिला वालवड शिवारात रविवारी (दि.4) बेशुद्ध अवस्थेत आढळल्यामुळे रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. ही महिला जातपंचायतीमध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
रोहकल (ता. परंडा) येथील गायरान जमिनीवर 2 ते 4 मेदरम्यान आदिवासी पारधी समाजाच्या जातपंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वालवड येथील सविता दस्तर्‍या काळे उपस्थित असल्याचे सांगण्यात येते. जातपंचायत उरकल्यानंर सविता काळे वालवड परिसरात रविवारी (दि.4) दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमरास बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. याची माहिती वालवडचे पोलिस पाटील हरी पाटील यांना समजताच त्यांनी वालवड पोलिसांशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला.

त्यानंतर वालवड औट पोस्टचे पोलिस कर्मचारी भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन काळे यांना वाहनाद्वारे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करून पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितले. जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले.
तेथेच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. जातपंचायतचे ठिकाण अंभी पोलिस ठाण्यातच्या हद्दीत येते, तर सविता काळे ज्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत आढळल्या ते ठिकाण वालवड औटपोस्टच्या हद्दीत आहे. यामुळे रात्री उशिरापर्यंत अंभी आणि भूम पोलिसांत हद्दीच्या वादामुळे गुन्हा दाखल झाला नव्हता.