आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parli Electricity Production Unit In Troble Laking Coal, Water

परळी वीजनिर्मिती केंद्रावर कोळसा, पाण्याचे संकट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा व आठ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने वीजनिर्मिती कधीही बंद पडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास त्याचा फटका रोजंदारीवरील तीन हजार कामगारांना बसणार आहे. केंद्रात कोळसा व पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची सहा महिन्यांतील दुसरी वेळ आहे. गोदावरी नदीवरील मुदगलच्या बंधा-यातून पाणी मिळवण्यासाठी उच्च स्तरावरून प्रयत्न होत आहेत. मात्र, त्याला स्थानिकांचा विरोध होऊ शकतो.

परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात दोनशे दहा मेगावॅट क्षमतेचे तीन व दोनशे पन्नास मेगावॅट क्षमतेचे दोन संच आहेत. पाच संचांची एकूण वीजनिर्मिती क्षमता ११३० मेगावॅटएवढी आहे. पाच संच पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी रोज अठरा हजार मेट्रिक टन कोळसा लागतो. महाराष्ट्रातील चंद्रपूर, आंध्र प्रदेश, कर्नाटक व ओरिसा येथून वीजनिर्मिती केंद्रात कोळशाचा कायम पुरवठा होत होता; परंतु बहुतांश खाणींतील कोळसा उत्खनन बंद असल्याने परळी येथे येणा-या कोळशाचा तुटवडा होत आहे. परळी येथील जुन्या वीजनिर्मिती केंद्र परिसरात केवळ पाच हजार मेट्रिक टन, तर नवीन वीजनिर्मिती केंद्र परिसरात दहा हजार टन दोळसा शिल्लक आहे. उपलब्ध दोळशावर दोन दिवस वीजनिर्मिती केंद्र चालू शकते. रोज केवळ एक किंवा दोनच वॅगन दोळशाचा पुरवठा सध्या होत आहे. त्यामुळे कोळसा तुटवड्याची टांगती तलवार वीजनिर्मिती केंद्रावर आहे.

पाच संच पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी रोज एक लाख लिटर क्युबिक पाण्याचा वापर होतो. परभणी जिल्ह्यात खडका येथे गोदावरी नदीवर बांधलेल्या बंधा-याची क्षमता पाच दशलक्ष घनमीटर आहे. बंधा-यातील पाणी साठा आठ दिवस पुरेल इतकाच आहे. आठवडाभरात बंधा-यात इतर स्रोतांमधून पाणी सोडले नाही तर परळीचे वीजनिर्मिती केंद्र बंद पडू शकते. पाचपैकी तीन संच चालू असल्याने साठ हजार मीटर क्युबिक पाण्याचा वापर होऊनही आठच दिवस पाणी पुरणार आहे.

वीजनिर्मिती केंद्राला तीन वर्षांपासून दुष्काळाचा फटका बसत आहे. वीजनिर्मिती केंद्राचा मुख्य स्रोत असलेल्या माजलगाव धरणात केवळ पाच टक्के पाणी साठा आहे.

वीजनिर्मिती अर्ध्यावर
परळी वीजनिर्मिती केंद्रात कोळसा व पाण्याचा पुरवठा योग्य प्रमाणात व सुरळीत नसल्यामुळे दोनशे दहा मेगावॅट क्षमतेचे संच क्रमांक तीन व चार बंद आहेत. सुरू असलेल्या दोनशे दहा मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक पाच व दोनशे पन्नास मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक सहा व सातमधून होणारी वीजनिर्मिती निम्मीच आहे.

..तर पाणी फेब्रुवारीपर्यंत
खडका बंधा-यापासून २५ किलोमीटर अंतरावरील मुदगल बंधा-यातून पाच दशलक्ष घनमीटर पाणी मिळाल्यास आगामी फेब्रुवारीपर्यंत वीजनिर्मिती केंद्र चालू शकते. अन्यथा पाण्याअभावी वीजनिर्मिती केंद्र बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर येऊ शकते.

वरिष्ठ स्तरावरून पाणी नियोजनाची माहिती नाही
दोन ते तीन दिवस पुरेल एवढा कोळसा साठा आहे. कोळसा पुरवठा सतत चालू राहिला तर अडचणी येणार नाहीत; परंतु एक किंवा दोनच वॅगन काेळसा येत असल्याने तीनच संच चालवले जात आहेत. खडका बंधा-यात पाण्याचा साठा आठ ते दहा दिवस पुरेल एवढाच आहे. शिवाय पाणी कोठून मिळणार याची वरिष्ठ स्तरावरून माहिती मिळालेली नाही. त्यामुळे पाणी मिळणार की नाही याबाबत काहीच सांगता येत नाही.
पी. आर. इंगळे, अधीक्षक अभियंता, वीजनिर्मिती केंद्र, परळी.