आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकारीची कुऱ्हाड- ऐन दुष्काळात परळी थर्मलचे दोन हजार कामगार बेरोजगार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - पाणी नसल्याने परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचे पाचही संच जुलैपासून बंद आहेत. केंद्र बंद असल्याने गुत्तेदारांकडे काम नाही. त्यामुळे गुत्तेदारांनी रोजंदारीवरील दोन हजार कामगारांना कामावरून कमी केले आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात या कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असून आता उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात २१० मेगावॅट क्षमतेचे तीन व २५० मेगावॅट क्षमतेचे दोन संच कार्यान्वित आहेत. पाचही संच पूर्ण क्षमतेने चालवायचे असतील तर एक लाख घनमीटर पाणी व १८ हजार मेट्रिक टन कोळसा लागतो. या केंद्रासाठी सोनपेठ तालुक्यातील खडका बंधारा, माजलगाव आणि पैठणचे जायकवाडी धरण येथून पाणीपुरवठा होतो. मात्र, खडका आणि माजलगावचे पाणी संपले आहे, तर जायकवाडीचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे हे औष्णिक वीजनिर्मिती केंद्र जुलैत बंद पडले आहे.
दहा हजार जणांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न
सध्या केंद्रात १ हजार २१५ अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यांच्या तिप्पट बेरोजगारांना गुत्तेदारांमार्फत रोजंदारीवर काम मिळत होते. हे कामगार परळी परिसरातील आहेत. पण आता त्यातील दोन हजार कामगारांचा रोजगार बंद झाला आहे. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या दहा हजार जणांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
२९८ कर्मचाऱ्यांची इतरत्र प्रतिनियुक्ती
जुलैपासून केंद्र बंद असल्याने या कर्मचाऱ्यांना कामेच नाहीत. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांत २९८ अधिकारी व कर्मचाऱ्यांना भुसावळ, चंद्रपूर, नाशिक येथील वीजनिर्मिती केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले आहे. गरजेनुसार विविध ठिकाणी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात येत आहे. विनंती अर्जावर बदली मागणाऱ्यांना तातडीने बदली दिली जात आहे.
इतिहासात दुसऱ्यांदा केंद्र पडले बंद
पाणीपुरवठ्यासाठी केंद्राने १९८० मध्ये सोनपेठ तालुक्यात खडका येथे पाच बंधारा बांधला. त्यातील पाणी संपल्यास माजलगाव व पैठणच्या धरणातून बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येते.सध्या माजलगाव येथील धरण जोत्याखाली आहे, तर पैठणच्या धरणात तर केवळ पाच टक्केच पाणीसाठा आहे.पाणीच नसल्याने हे केंद्र इतिहासात दुसऱ्यांदा जुलै महिन्यात बंद पडले.
मजुरी देणे अशक्य
रोजंदारीवर काम करणारे कामगार गुत्तेदारामार्फत नियुक्त असतात. काम नसले तर त्यांना मजुरी देता येणार नाही.
- आर. बी. गोहणे, मुख्य अभियंता.
जगायचे कसे?
यंदा सलग चौथ्या वर्षी दुष्काळ आहे. उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद आहेत. कामगार कुटुंबासमोर जगायचे कसे, असा प्रश्न आहे.
- अंगद हाडबे, गुत्तेदार.
४ महिने काम बंदच
ऑगस्टपासून काम बंद आहे. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय.
- बी. जी. खाडे, अध्यक्ष, सेंटर फॉर ट्रेड युनियन