आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडे यांचे कट्टर समर्थक पाशा पटेलांचा पत्ता कट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- भाजपअंतर्गत राजकारणामुळे गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेल्या पाशा पटेल यांना विधान परिषदेची दुस-यांदा उमेदवारी मिळाली नाही. भाजपचा मुस्लिम आणि शेतकरी चेहरा अशी पाशा पटेलांची ओळख आहे. रांगड्या वक्तृत्व कौशल्यावर शेतक-यांचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी पटेलांनी सहा वर्षांत प्रयत्न केले असले तरी त्यांच्यामुळे मुस्लिम समाज भाजपशी जोडला गेला नाही. हेच कारण दाखवून त्यांना दुस-यांदा विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, यामुळे पाशा पटेलांनी सुरू केलेली कृषिमूल्य आयोगासोबतची लढाई अर्ध्यावर राहिली आहे.
शेतकरी संघटनेत आयुष्य घातलेल्या पटेलांकडे वर्क्तृत्व असले तरी निवडणुका जिंकण्याचे कौशल्य नव्हते. त्यामुळे ते आधाराच्या शोधात होते. त्यातच मुंडेंनी त्यांना भाजपच्या व्यासपीठावर आणले. मुस्लिम चेहरा आणि शेतक-यांचा नेता या दोन बाबी पक्षासाठी फायद्याच्या
ठरतील हे वरिष्ठांना पटवून देत त्यांनी 2006 मध्ये त्यांना विधानपरिषदेवर निवडून आणले.
आमदारकीच्या सहा वर्षाच्या काळात केलेल्या प्रत्येक भाषणात रस्त्यावरच्या सामान्य पाशाला मुंडेंनी आमदार केले हे पालुपद पाशा पटेल आळवत होते. आमदारकीच्या काळात त्यांनी विधिमंडळात सातत्याने शेतक-यांशी संबंधित मुद्दे मांडले आणि प्रसंगी भांडून ते सोडवूनही घेतले. कृषीमूल्य आयोगाच्या माध्यमातून शेतक-यांच्या पिकाला हमीभावापेक्षा जास्त पैसे मिळावेत यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. मात्र, त्यांचा पक्षाला व्यावसायिक मूल्यातून फायदा झाला नाही. भाजपशी शेतकरी जोडले गेले किंवा मुस्लिम मतदार जोडले गेले असे घडले नाही.
काँग्रेस, राष्ट्रवादीची ऑफर होती- विधान परिषदेवर दुस-यांदा संधी मिळणे अपेक्षित होते. शेतक-यांसाठी केलेल्या कामाबाबत नितीन गडकरी आणि मुंडे यांना आपण बोललो होतो. मात्र, तिकीट मिळाले नाही. शेतक-यांच्या प्रश्नांची लढाई अर्ध्यावरच राहिली. मध्येच माझे शस्त्र काढून घेण्यात आले आहे. एखाद्या रुग्णाला डायलिसीसवर ठेवल्यानंतर त्याच्या नळ्या काढून घेण्यासारखा हा प्रकार आहे. आता या प्रश्नावर एखादा आमदार आवाज उठवेल असे वाटत नाही. मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेचे तिकीट देण्याची ऑफर दिली होती. मात्र, पक्षाशी बेईमानी करायची नाही हे ठरवल्यामुळे तिकडे गेलो नाही आणि जाणारही नाही. आपण भाजप आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत आहोत.- पाशा पटेल, आमदार, भाजप.