आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिल्लर माणसांकडून मुंडेंची दिशाभूल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - ‘भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करतात. त्यांच्या सान्निध्यात राहून शेतकर्‍यांचे प्रश्न राज्य, राष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे मांडून ते सोडवून घेता यावेत, हा माझा स्वार्थ आहे. खासदार मुंडेंजवळील चिल्लर माणसेच त्यांची दिशाभूल करतात. मात्र, त्यांच्या लढाईला बळ मिळावे यासाठी मी त्यांची साथ सोडणार नाही. पवारांना आताच काय, वर्षभरात मी भेटल्याचं कोणीही दाखवावं, माझी प्रॉपर्टी सोडतो!’ या शब्दांत भाजपचे माजी आमदार पाशा पटेल यांनी भावना व्यक्त केल्या.

विधान परिषदेवर फेरनिवड होण्याऐवजी त्यांना सध्या माजी आमदार असे बिरूद लागलेले आहे. त्यामुळे सात-आठ वर्षांपासून खासदार मुंडेंच्या मागे-पुढे फिरणारे पाशा पटेल सध्या विजनवासात आहेत. यातच बीडमध्ये झालेल्या महाएल्गार सभेकडेही त्यांनी पाठ फिरवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ते संपर्कात आहेत, दोनदा त्यांच्या भेटीही झाल्या, अशा चर्चेला पेव फुटले. या संदर्भात त्यांच्याशी रविवारी संपर्क साधला असता त्यांनी ‘दिव्य मराठी’शी चर्चा केली. ‘मी भाजप आणि खासदार मुंडेंना सोडणं शक्य नाही ! राष्ट्रवादी नेत्यांच्या संपर्कात आहे, दोनदा भेटी झाल्या, मी तिकडे जाणार, हे सर्व खोटं आहे,’ असेही ते म्हणाले.

शेट्टी चुकून खासदार- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी चुकून खासदार झाले. मतांच्या राजकारणात कोणीही निवडून येतो. आता खासदार मुंडे शेट्टींना सोबत घेऊन फिरत आहेत. मी मुंडेंचा कार्यकर्ता आहे. शेट्टींचा कार्यकर्ता होऊ शकत नाही. - पाशा पटेल, माजी विधान परिषद सदस्य.