आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांसाठी रक्ताचे पाणी करू, 2 महिन्यांत शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढवण्यासाठी प्रयत्न- पाशा पटेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 बीड - शिफारस करणे हे महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे काम असून शेतकऱ्यांबाबत माझी भावना शुद्ध अाहे. त्यांना दोन घास सुखाने कसे खायला मिळतील यासाठी मला काम करायचे आहे. काळ्या आईसाठी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी रक्ताचे पाणी करण्याची माझी तयारी आहे. येत्या दोन महिन्यांत  शेतकऱ्याच्या मालाचे बाजारात भाव कसे वाढतील यासाठी मी कामाला लागलो आहे, अशी ग्वाही महाराष्ट कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी बीड येथे केले.  

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने बीड येथील स्काऊट भवनात शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता आयोजित व्याख्यानमालेत पाशा पटेल बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, सभापती संतोष हंगे, तर व्यासपीठावर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष वसंत मुंडे, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष मानूरकर, ज्येष्ठ पत्रकार महेश वाघमारे, शेतीनिष्ठ शेतकरी  शिवराम घोडके, सलीम जहांगीर, दिलीप गोरे, सय्यद नवीदुज्जमा, वैभव स्वामी, कालिदास आपेट आदी उपस्थित होते.  
 
पुढे बोलताना पटेल म्हणाले की, आरोप करणे फार सोपे असते. त्यात बेछूट आरोप करणे त्याहून सोपे. परंतु मी  शेतकरी संघटनेत पुढारी होण्यासाठी आले नव्हतो. गावात समाजकारण केले. त्यानंतर राजकारणात आलो.  शेती हा विषय समजून घेतल्यानंतरच या क्षेत्रात पाऊल ठेवले. सामाजिक काम करताना जोपर्यंत विषय कळत नाही तोपर्यंत तो मांडला जाऊ नये. सध्याच्या राज्य माल समितीमधूनच कृषी मूल्य आयोग तयार झाला आहे.
 
मागील दहा वर्षांच्या काळातील प्रत्येक दिवस यात खर्च झाला म्हणूनच कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली. २००७ मध्ये  आयोगाची कागदपत्रे बाहेर आली. प्रत्येक राज्याला कृषी मूल्य आयोग असलाच पाहिजे हे माझे स्वप्न होते. ते पूर्ण झाले आहे.  मुख्यमंत्र्यांनी माझी अध्यक्ष म्हणून  निवड केली आहे. अध्यक्ष म्हणून काम करताना यश येईल की नाही हे मला माहीत नाही, परंतु चांगले काम करू, असेही पाशा पटेल यांनी सांगितले.

आत्महत्येचा विचार होता  
वडील मुकादम होते. २५ एकरपैकी दहा एकर जमीन सावकाराचे कर्ज फेडण्यात विकावी लागली. मनात आत्महत्या करण्याचा विचार आला.  हे वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी मला माझ्या बहिणीकडे काही दिवस ठेवले. मित्रांची जीवन जगण्याची हिंमत पाहून मी ठरवले की आत्महत्या तर नामर्द करतात.  म्हणून गावात शेतीच्या अभ्यासासाठी डॉ. आंबेडकरांंच्या नावाने सार्वजनिक वाचनालय सुरू केले, अशी आठवणही पटेल यांनी सांगितली.
 
बातम्या आणखी आहेत...