आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोरांचे संवर्धन, संगोपनासाठी प्राध्यापकाचे वनमंत्र्यांना साकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - नांदेडपासून केवळ दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या व लोहा तालुक्यातील रामदास तांडा परिसरात राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. मात्र, त्यांचे व्यवस्थित संगोपन होत नसल्यामुळे व अंडे, मांस भक्षणासाठी हत्या होत असल्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे रामदास तांडा येथील प्रा. डी. आर. पवार यांनी मोरांचे संगोपन व संवर्धनासाठी थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाच साकडे घातले आहे.

पेशाने प्राध्यापक असलेले पवार यांना निसर्ग व शेतीचे वेड आहे. त्यांची रामदास तांडा येथे शेती आहे. त्या परिसरात मोर मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांनी मोरांना जवळून पाहिले आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून मोरांची पिसे व मांस भक्षणासाठी हत्या होत आहे. परिसरातील वृक्षांचीही तोड होत आहे. त्यामुळे मोरांची संख्या घटत असल्याने प्रा. पवार अस्वस्थ झाले. मोरांची हत्या रोखण्यासाठी वन विभागानेही लक्ष देण्याची गरज असल्याचे मत प्रा. पवार यांनी दै. दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केले. त्यांनी आपल्या एकूण १२ एकर शेतीपैकी दोन एकर शेती मोरांचे संवर्धन व संगोपन नैसर्गिक पद्धतीने व्हावे व मोरांचे अभयारण्यच त्या ठिकाणी व्हावे, या हेतूने देण्याचा मनोदय व्यक्त केला.

यासंदर्भात नुकतीच त्यांनी मुंबईला जाऊन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. रामदास तांडा परिसरात असलेल्या मोरांचा अधिवास असलेल्या ठिकाणास मोर संवर्धन क्षेत्र असे घोषित करावे, त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, आदी मागण्याही त्यांनी निवेदनात केल्या आहेत. वनमंत्री मुनगंटीवार यांच्यासह त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव विकास खारगे यांचीही भेट घेऊन त्यांनाही मोरांच्या मोर संवर्धन क्षेत्राच्या संदर्भात माहिती दिली. खारगे यांनीही यासंदर्भात उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांना दिले असल्याची माहिती प्रा. पवार यांनी दिली.

वनमंत्री पाहणी करणार
वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी मोर संवर्धन करण्याच्या प्रस्तावास अनुकूलता दाखवली आहे. याबरोबरच येत्या १७ नोव्हेंबर रोजी नांदेड दौऱ्यावर आल्यास त्यांनी रामदास तांडा परिसरातील मोरांचा अधिवास असलेल्या भागाची पाहणी करणार असल्याचेही सांगितले. - प्रा. डी. आर. पवार, पक्षिप्रेमी, रामदास तांडा
बातम्या आणखी आहेत...