आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात एकाच वेळी पाऊस अन् पाणीटंचाई, हवामानातील बदलाचा फटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - वादळी वारे, जोरदार पाऊस आणि गारपीट अशी एकीकडे अवस्था असताना दुसरीकडे पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ जिल्हा प्रशासन आणि लोकांवर आली आहे. पाऊस आणि पाणीटंचाई या दोन्ही गोष्टी एकत्रित येण्याचा गंभीर प्रसंग ओढवला आहे.
साधारण जून, जुलै महिन्यात पावसाळ्यात जोराचा पाऊस होतो. त्यामुळे नदी-नाल्यांना पाणी येणे, पिकांचे नुकसान होणे असे प्रकार होतात. वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडणे, झाडे उन्मळून पडणे असे अपघात घडतात. त्याचा मुकाबला करण्यासाठी साधारण उन्हाळ्यामध्येच जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करीत असते. त्यासाठीची सगळी यंत्रणा सज्ज ठेवली जाते. तर उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई जाणवणार याचा अंदाज घेऊन टंचाई आढावा बैठका घेतल्या जातात. त्यामध्ये कोणत्या गावात पाणी, चारा उपलब्ध आहे, पाणीटंचाई जाणवल्यास विहिरींचे अधिग्रहण करणे, टँकर सुरू करणे, चारा छावण्या सुरू करणे अशा पद्धतीने अंमलबजावणी केली जाते. मात्र, हवामानातील बदलांमुळे लोकांना सध्या नक्की कोणता ऋतू सुरू आहे हेच कळेनासे झाले आहे. कधीही पाऊस पडणे, विजा कोसळणे, जोराचा वारा सुटणे, कडक ऊन पडणे, गारपिटीमुळे थंडी पडणे असे विचित्र प्रकार सुरू आहेत. त्यामुळे लोकांना जसे अडचणींना सामोरे जावे लागत आहे, तसे जिल्हा प्रशासनासमोरही कोडे पडले आहे. एकीकडे टंचाई निवारणाची कामे सुरू असतानाच मधेच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसानीच्या पंचनाम्याची कामे प्रशासनाला करावी लागत आहेत. दुसरीकडे पावसामुळे लातूरसारख्या शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्त मिटला असला तरी ग्रामीण भागातील पाणीटंचाई कायमच आहे. तेथे टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे. त्यामुळे एकाच वेळी पाणीटंचाईचा आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचा गंभीर प्रसंग जिल्हा प्रशासनावर ओढवला आहे.

सलग दुस-या वर्षी झाली पुनरावृत्ती
गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीला मराठवाड्यात गारपीट झाली होती. त्याची सुरुवात लातूर जिल्ह्यातल्या निटूरपासून झाली होती. त्या वेळी जिल्हा प्रशासन निटूरसह जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या गावांतील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात व्यग्र होते. त्याच वेळी झालेल्या जोरदार गारपिटीमुळे निटूरसारख्या गावात चक्क बर्फाची चादर पसरली होती. त्यामुळे जिथे पाणीटंचाईचे काम करायचे तिथेच रस्त्यावर पसरलेला बर्फ ट्रॅक्टरने बाजूला काढण्याचे काम प्रशासनाने केले होते. पुढे गारपिटीचे लोण मराठवाड्यात सगळीकडेच पसरले. त्या वेळीही पाणीटंचाईची तयारी आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने एकाच वेळी आटोपले होते.

लातूर जिल्ह्यात ४६ टँकर
लातूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यापर्यंत १५३ गावांना ४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर २४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. चार दिवसांच्या पाऊस आणि गारपिटीने त्यात कसलीही घट झालेली नाही. गेल्या आठवड्यात जी तलाठी, ग्रामसेवक मंडळी टँकरची संख्या मोजण्यात व्यग्र होती, तीच मंडळी चार दिवसांपासून पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करीत आहेत.