आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Participation Is Good, But BJP Leaders Disappered, Divya Marathi

लोकसहभाग उत्तम; भाजप नेते मात्र गायब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या आणि जिल्ह्यातील सहाही विधानसभा जिंकून राज्याच्या राजकारणावर अंकुश मिळवण्याचा प्रयत्न करणा-या जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधी जयंतीदिनी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाला खो दिला. शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि शाळांमधील चिमुकल्यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वच्छ भारत अभियान राबवले, तर भाजप नेते प्रचारातच दंग राहिले.

संपूर्ण देशभरात या अभियानची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली. बीड जिल्ह्यात मात्र पहिल्याच दिवशी भाजप नेत्यांनी या योजनेचा फज्जा उडवला. शासनाचा उपक्रम असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासह सरकारी, निमसरकारी कार्यालयांत तसेच शिशुवाटिका, बालवाडीपासून शाळा-महाविद्यालयांमध्ये सकाळीच अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी झाडू हातात घेऊन परिसर स्वच्छ केला आणि पंतप्रधानांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा प्रारंभ केला. दुसरीकडे राजकीय पुढा-यांनी मात्र या मोहिमेकडे पाठ फ‍िरवली. निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत दंग असलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सकाळपासूनच गाठीभेटींवर भर दिला. परळीतून गंगाखेड येथील प्रचारसभा आटोपून आष्टी, पाटोदा येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या.
जालना | रेल्वेस्थानक, नगरपालिकासह जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी गावातही स्वच्छता केली. जालना शहरात विविध सामाजीक संस्थांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शहर भाजप कार्यकर्त्यांनी गांधी चमन येथे स्वच्छता केली. दुसरीकडे जिल्ह्यातील भाजपच्या मोठ्या नेत्यांनी मात्र या अभियानाकडे पाठ फिरवली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे दिवसभर जिल्ह्याबाहेर होते. तर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बबनराव लोणीकर, उमेदवार विलासराव खरात, अरविंद चव्हाण, संतोष दानवे, नारायण कुचे मात्र प्रचारातच दंग होते.
नांदेड | भाजपचे उमेदवार, माजी खासदार, जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष यापैकी कोणीही स्वच्छता अभियानात उतरले नाही. विधानसभा निवडणुकीत मोदींच्याच नावाने मताचा जोगवा मागणा-या नेत्यांनी आपल्या नेत्यांकडेही पाठ फिरवली, असे चित्र दिसून आले. दरम्यान, जिल्ह्यातील १ हजार ३०९ ग्रामपंचायतींतील पदाधिकारी व नागरिकांनी शपथ घेतल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी सांगितले.
नेते एकमेकांच्याच स्वच्छतेत गुंग असल्याने स्वच्छता अभियानाकडे फिरकले नाहीत.
अरुंधती पुरंदरे, माजी नगरसेविका
हिंगोली | स्वच्छ भारत मोहिमेपासून जिल्हाभरातील भाजप कार्यकर्ते दूरच असल्याचे दिसून आले. मात्र, स्वयंसेवी संस्था, सरकारी यंत्रणा आणि विद्यार्थ्यांनी या मोहिमेला उदंड प्रतिसाद देऊन सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता केली.
परभणी | जिल्ह्यातील चारही जागा लढवणा-या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-यांचे या मोहिमेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी अनुपस्थीत होते. मात्र, सकाळी पावणेदहा वाजता जिल्हा परिषदेच्या ११२४ शाळांतील विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडीमधील विद्यार्थी तसेच ७०४ ग्रामपंचायतींमध्ये गांधी जयंती साजरी करून स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता केली.
लातूर | शहरात मात्र या मोहिमेस चांगलाच प्रतिसाद मिळाला. भाजपचे खासदार सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेस्थानक, गांधी चौक, बसस्थानक, गंजगोलाई या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या वेळी भाजपचे लातूर शहरामधील उमेदवार शैलेश लाहोटी यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. गायकवाड यांनी शहरभर फिरून स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतला. तालुक्यांच्या ठिकाणीही भाजपच्या पदाधिका-यांनी चौकाचौकांमध्ये झाडू चालवला.