आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद शहरातील पाच रेशन दुकानदारांचे परवाने निलंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - गरीब शेतकऱ्यांची योजना प्रतिष्ठित शेतकऱ्यांच्या नावावर हडप करणाऱ्या उस्मानाबाद शहरातील पाच स्वस्त धान्य दुकानदारांचे विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहेत. ‘दिव्य मराठी’ने २६ फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील घोटाळा उघडकीस आणला होता. त्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने चौकशी करून सात दिवसांत मोठी कारवाई केली आहे. 
 
दरम्यान, पुरवठा विभागातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील भ्रष्टाचाराच्या वृत्त मालिकेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी(दि.४) पुरवठा विभागाच्या उपायुक्त वर्षा ठाकूर-घुगे यांनी उस्मानाबादेत मराठवाड्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यंाची बैठक घेतली. त्यात योजनेचा आढावा घेऊन भ्रष्टाचार करणाऱ्यांवर तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या. 
 
शासनाने दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील ८ तसेच विदर्भातील ६, अशा एकूण १४ जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी अन्न सुरक्षा योजना ऑगस्ट २०१५ पासून सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गरीब शेतकऱ्यांची उपासमार होऊ नये, यासाठी दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये प्रतिकिलो तांदूळ, या दराने स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळते. वास्तविक ही योजनाच अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही. शिवाय शहरी भागात योजनेत समाविष्ट असलेले बहुतांश प्रतिष्ठीत शेतकरी धान्य उचलत नाहीत. मात्र, या शेतकऱ्यांच्या नावाने येणाऱ्या संपूर्ण मालाचे वितरण होत असल्याचे स्वस्त धान्य दुकानदार सांगतात. परिणामी संपूर्ण धान्याची विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे प्रतिष्ठीत व्यक्तींसह अनेक अंधारात असलेल्या शेतकऱ्यांच्या नावाचा वापर करून कोट्यवधी रुपयांचे धान्य लाटण्यात येत आहे. 
 
‘दिव्य मराठी’ने पुराव्यानिशी २६ फेब्रुवारीच्या अंकात यासंबंधी वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना तातडीचे आदेश काढून चौकशी अहवाल देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार शुक्रवारी (दि.३) तहसीलदारांनी पुरवठा अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला. त्यात "दिव्य मराठी'ने प्रसिद्ध केलेल्या मुद्यानुसार चौकशी केल्याचे म्हटले होते. तसेच त्यानुसार बातमीमध्ये प्रसिद्ध झालेल्या शहरातील ५ प्रतिष्ठीत व्यक्तींपैकी काही जणांचे जवाब घेण्यात आले. तसेच संबंधित पाच दुकानांमध्ये तपासणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या नावे आलेल्या धान्याचा साठा आढळून आला नाही. तसेच अभिलेखे अद्ययावत नसल्याचे स्पष्ट झाले. अहवालानुसार शनिवारी(दि.४) संबंधित पाच दुकानांवर धडक कारवाई करण्यात आली असून या दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.  
 
असे आहेत दोष: जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या आदेशावरून उस्मानाबाद शहरातील पाच रेशन दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले असून,त्यात दुकान क्रमांक २१, दुकान क्रमांक १६, दुकान क्रमांक ८, दुकान क्रमांक १७ आणि दुकान क्रमांक १२ यांचा समावेश अाहे. लाभार्थींच्या नावावर शिधापत्रिकेवरील धान्य रास्त भावदुकानदारांनी उचलले आहे. मात्र ते लाभार्थ्यांनी उचलले नाही. लाभार्थींनी न उचललेले धान्य रास्त भाव दुकानात शिल्लक असणे अभिप्रेत आहे. तसेच संबंधित रास्त भाव दुकानदारांनी सदर लाभार्थी धान्य उचलत नसल्याचे तहसील कार्यालयास अवगत करून संबंधित शिधापत्रिकेस देय असणारे धान्य नियतन उचलणे बंद करणेही अभिप्रेत होते. मात्र, अशी कोणत्याही प्रकारची कार्यवाही अनुसरण्यात आली नसल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे.  

त्यांचा खुलासा समाधानकारक नाही 
शहरातील व्यक्तींशी संबंधित पाच रेशन दुकानांची चौकशी करण्यात आल्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांसमोर दुकानदार समाधानकारक खुलासा करू शकले नाहीत. त्यांनी कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. त्यामुळे दोषी आढळून आलेल्या दुकानांचे परवाने महाराष्ट्र अनुसुचित वस्तू वितरणाचे विनियमन आदेश १९७५ चे कलम ३ तसेच महाराष्ट्र अनुसुचित वस्तू किरकोळ व्यापार परवाना आदेश १९७९ चे कलम ११ नुसार जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद लाटकर यांनी परवाने निलंबनाचे आदेश काढले. 
बातम्या आणखी आहेत...