आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोलियमचे साठे आणतील दुष्काळी गोदावरी खोऱ्यात समृद्धी, शोध सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीखाली पेट्रोलियम पदार्थांचे साठे सापडू शकतात. त्यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने देशभरातील गाळयुक्त खाेऱ्यांत टू-डी सिस्मिक सर्वेक्षणाचा प्रकल्प हाती घेतला आहे.
ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पाेरेशनच्या वतीने (ओएनजीसी) जालन्यापाठोपाठ पैठणमध्ये जमिनीखालील खडकांचे नमुने गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. सर्वकाही व्यवस्थित जुळून आले तर २०१९ च्या अखेरपर्यंत येेथे कच्च्या तेलाच्या विहिरी तयार होऊन २०२० पर्यंत त्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांची रेलचेल दिसून येईल.
देशातील गाळयुक्त खाेऱ्यांत हायड्रोकार्बनचे साठे शोधण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने पाच हजार कोटींचा नॅशनल सिस्मिक प्रकल्प सुरू केला आहे. याअंतर्गत ओएनजीसी महाराष्ट्रासह १८ राज्यांतील २६ सेडिमेंट्री बेसिनमधील सुमारे ४०,८३५ लाइन किलोमीटर प्रदेशात हायड्रोकार्बनचा शोध घेईल, तर ऑइल इंडिया लिमिटेड पाच राज्यांतील ७४०८ लाइन किलोमीटर परिसरात हायड्रोकार्बनचा शोध घेईल.
मार्च २०१९ पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. याची सुरुवात ओडिशातील बलसौर जिल्ह्यातल्या महानदी पात्रातील साठे शोधण्यापासून झाली. एकदा का येथे साठे सापडले तर उत्खनन आणि प्रक्रिया करण्याच्या उद्योगांना निमंत्रित केले जाईल.
हायड्रोकार्बनचा शोध घेण्यासाठी २-डी सिस्मिक डेटा पद्धतीचा वापर केला जात आहे. यास २ डी एक्विसिझन, प्रोसेसिंग अँड इंटरप्रिटिशन (एपीआय) असे म्हटले जाते. हे सर्वेक्षण करण्याचे कंत्राट हैदराबादच्या अल्फा इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीला मिळाले आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात जालना जिल्ह्यातील राणी उंचेगाव ते शिर्डीपर्यंत भूगर्भातील नमुने गोळा केले जाणार आहेत.

दोन महिन्यांपूर्वी राणी उंचेगावात या कामाला सुरुवात झाली. तेथे सुमारे ६० विंधन विहिरी खोदून गाळाचे नमुने गोळा करण्यात आले. गेल्या आठवड्यात पैठण तालुक्यातील बिडकीन, डोणगाव तांबे, गेवराई बाशी, बालानगर आणि कापूसवाडी या डोंगराळ भागात ७० विंधन विहिरी खोदून नमने गोळा करण्यात आले. अचानक झालेल्या या कामामुळे शेतकरी संतप्त झाले.

मात्र, जिल्हा प्रशासनाने अल्फा इंडियाच्या प्रतिनिधींना कागदपत्रे घेऊन कार्यालयात बोलावले. प्रत्यक्ष साइटवर जाऊन पाहणीही केली. मात्र, कंपनीने थेट केंद्राचे तसेच मुख्य सचिवांचे पत्र दाखवल्यावर प्रशासनाने त्यांना कामात सहकार्य केले. हा प्रकल्प राबवताना शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले तर पंचनामे करून त्याची नुकसान भरपाई देण्याची सूचना मुख्य सचिवांनी केली आहे.
३४ हजार कोटी
रुपयांची गुंतवणूक करणार ओएनजीसी या संपूर्ण प्रकल्पासाठी
३५ विहिरींतून तेल, गॅस मिळणार
- नुकतेच कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील ब्लॉक केजी-डीब्ल्यूएन-९८/२ या ठिकाणी ओनएजीसीला पेट्रोलियमचे साठे अाढळले आहेत. हा ब्लॉक तीन सबब्लॉकमध्ये विभागण्यात आला आहे.
- प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर अंदाजे २०२२ पर्यंत पहिल्या ब्लॉकमधून दिवसाकाठी ७७३०५ बॅरल कच्चे तेल आणि १६.२९ मिलियन मेट्रिक क्युबिक मीटर नैसर्गिक वायूची निर्मिती होईल.
- दुसऱ्या ब्लॉकमध्ये ९४.२६ मिलियन टन कच्च्या तेलाचा, तर २१.७५ बिलियन क्युबिक मीटर नैसर्गिक वायूचा साठा आहे.
- तिसऱ्या ब्लॉकमध्ये केवळ १२.७५ बिलियन क्युबिक मीटर नैसर्गिक वायूचा साठा आहे. हा साठा उपसण्यासाठी ३५ विहीरी तयार केल्या जातील. पैकी १५ तेलाच्या, ९ वायूसाठी, तर उर्वरित ११ अन्य कामासाठी असतील.
- या संपूर्ण प्रकल्पासाठी ओएनजीसी सुमारे ३४ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. या ब्लॉकमध्ये पेट्रोलियम आढळल्याने गोदावरी खोऱ्यातील अन्य भागातही कच्च्या तेलाचे साठे आढळण्याची शक्यता बळावली आहे. तसे झाल्यास दुष्काळी मराठवाड्याचे चित्र बदलेल.

गरज काय?
भारत आजघडीला १९० मिलियन टन कच्चे तेल आयात करतो. हा देशाच्या एकूण गरजेच्या ७० टक्क्यांहून अधिक वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत कच्च्या तेलाच्या निर्यातीत किमान १० टक्के घट करण्याचे धोरण आखले अाहे. ही कमी भरून काढण्यासाठी देशांतर्गत तेलाचे साठे शोधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याच्या सोबतीला स्वच्छ इंधनाचे स्रोत म्हणून नैसर्गिक वायूला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सिमेंट, खत, स्टील उद्योगात इंधन म्हणून नैसर्गिक वायूचा वापर शक्य आहे.
बातम्या आणखी आहेत...