आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जलयुक्त लातूर’ चळवळीसाठी दानशूर मदतीसाठी सरसावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लोकसहभागातून राबवण्यात येत असलेल्या जलयुक्त लातूर चळवळीसाठी विविध सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती सरसावलेल्या असून, दाते स्वतः होऊन निधी देण्यासाठी पुढे येत आहेत. मदतीचा हा ओघ दिवसागणिक वाढतच चालला आहे.

महाराष्ट्र बायो फर्टिलायझर्स इंडिया प्रा.लि (एमबीएफ) या कंपनीच्या वतीने जलयुक्त लातूर चळवळीस पाच लाख दोन हजारांचा निधी देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. एमबीएफ कंपनीचे कार्यकारी संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते नीलेश ठक्कर यांनी स्वतःजवळील दोन लाख ५१ हजार रुपये जलयुक्त लातूर चळवळीसाठी देण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी एमबीएफच्या कर्मचाऱ्यांची बैठक बोलावून या कामासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी आपल्या पगारातील पाच टक्के वाटा देण्याचा निर्णय जाहीर करून दोन लाख ५१ हजार रुपये जमा केले. हा निधी सार्वजनिक जलयुक्त लातूर व्यवस्थान समिती न्यासाचे अध्यक्ष डॉ. अशोकराव कुकडे यांच्याकडे सोपवण्यात आला.

समाजवादी नेते तथा लातूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मनोहराव गोमारे यांनी पहिल्याच बैठकीत सर्वप्रथम ११ हजारांचा निधी दिला तर त्यांच्या शिक्षण संस्थेने एक लाख रुपयांचा आणखी निधी दिला आहे. तसेच लातूर एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानेश्वर विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार देण्याचे जाहीर केले आहे. कर्मचाऱ्यांकडून मिळणारी रक्कम एक लाख ५७ हजार इतकी होते. शिवाय लातूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष टी.जी. शेळके, सचिव डी. एन. शेळके, कोशाध्यक्ष प्रा. नागनाथ कणसे, सहसचिव पल्हाद दुडिले यांनी प्रत्येकी ११ हजार रुपये दिले आहेत.

शहरातील दयानंद शिक्षण संस्थेनेही या चळवळीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी ३१ हजारांचा निधी जाहीर केला आहे तर सचिव रमेश बियाणी यांनी २१ हजारांचा निधी दिला आहे. दयानंद शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार देण्याचे जाहीर केले असून तिन्ही शाखेच्या प्राचार्यांनी प्रत्येकी २५ हजारांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रा. संदीप जगदाळे यांनीही ११ हजार रुपये दिले आहेत. दयानंद कला महाविद्यालयातील प्राध्यापकांनी २१ हजार रुपये सर्व क्रीडा शिक्षकांनी ११ हजार रुपये देण्याचा संकल्प केला आहे. तसेच महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य व साहित्यिक नागोराव कुंभार यांनी २०५० रुपये कार्यालयात आणून जमा केले आहेत.

येथील प्रतिभा बब्रुवान गोसाळे या गृहिणीने हॉटेल अंजनीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या एक दिवसांचा पगार जमा केला आहे. ५१ हजार रुपयांचा धनादेशही त्यांनी यापूर्वीच जलयुक्त चळवळीसाठी दिला आहे. जलयुक्त लातूर चळवळीसाठी यलम मित्र मंडळाने ५१ हजार रुपये, कृष्ण कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक बिर्ले यांनी २५ हजार रुपये, आशिष हरकचंद लोया, अरविंद लातुरे यांनी प्रत्येकी ११ हजार रुपये, गुरू शांतप्पा लातुरे यांनी २५ हजार रुपये, विश्वनाथ किणीकर यांनी ५१०० रुपये, डॉ. सुरेश भट्टड यांनी २१०० रुपये, महेश शिवाजीराव गंभीरे यांनी २१०० रुपये, मनमंदिर कापड दुकानातील कर्मचाऱ्यांनी ५००१ रुपयांचा निधी जलयुक्त चळवळ कार्यालयात जमा केला आहे.
बातम्या आणखी आहेत...