आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक- सोयगाव, फुलंब्रीत प्रत्येकी १७ वार्डांचे आरक्षण जाहीर, १८ महिलांना संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री - फुलंब्री नगर पंचायत निवडणुकीसाठी उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्या मार्गदर्शनात गुरुवारी आरक्षण सोडत झाली. नगर पंचायतमध्ये १७ सदस्य असून यात ९ महिलांचा समावेश आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार वाॅर्ड रचना करण्यात आली. त्यानुसार हे आरक्षण निश्चित करण्यात आले. प्रथम वाॅर्ड क्र. सहा अनुसूचित जाती, तर वाॅर्ड क्र. १० अनुसूचित जमाती असे लोकसंख्येनुसार चिठ्ठ्या टाकून आरक्षित झाले. हे दोन्ही वाॅर्ड महिलांसाठी आरक्षित झाले. यानंतर पाच वाॅर्ड हे ओबीसीसाठी काढले गेले. चिठ्ठ्याद्वारे पाचपैकी तीन वाॅर्ड हे महिलासांठी आरक्षित झाले. यानंतर १० वाॅर्ड हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून चार महिला आरक्षित झाल्या आहेत. या सर्व प्रक्रियेवर हरकत घेण्यासाठी २४ ते ३१ ऑगस्टची वेळ देण्यात आली आहे.

तहसीलदार तथा नगर पंचायत प्रशासक किशोर देशमुख व मुख्याधिकारी अशोक कायंदे यांनी या आरक्षण प्रक्रियेचे काम पाहिले. माजी जि. प. अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, माजी सरपंच सुहास शिरसाठ, देवगिरी कारखाना उपाध्यक्ष नितीन देशमुख, राजू प्रधान, महमूद पटेल, रऊफ कुरेशी, गजानन नागरे आदी या वेळी उपस्थित होते.

वाॅर्डाची माहिती न देता आरक्षण
२०११ च्या जनगणेनुसार वाॅर्ड रचना करण्यात आली. याच्या याद्यादेखील प्रसिद्ध नाहीत अारक्षणाच्या वेळी फक्त वाॅर्ड कसे आहेत याचे पत्रक चिकटवण्यात आले. यामुळे कोण कोणत्या वाॅर्डात आहे हे नागरिकांना समजले नाही. यामुळे हे आरक्षण कसे होत आहे यात सर्व नागरिक संभ्रमात राहिले व गोंधळून गेले. आरक्षण पूर्ण झाल्यानंतरदेखील अद्याप हे वाॅर्ड समजलेले नाही. अशा वेळी हे आरक्षण लादले गेले असे या वेळी काही उपस्थित कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले.

शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे यांनी हाच प्रश्न उपस्थित केला. वाॅर्ड रचना माहीत नाही, हातात वाॅर्डाच्या मतदार याद्या नाही, तर आरक्षण कसे काढता. आठ दिवस अगोदर वॉर्ड रचनेच्या मतदार याद्या प्रसिद्ध व्हायला पाहिजे होते व नंतर आरक्षण लक्षात आले असते असे ठोंबरे म्हणाले.

असे आहे वाॅर्डनिहाय आरक्षण
वाॅर्ड क्र. १,२,३ ओबीसी महिला, वाॅर्ड क्र. ४ सर्वसाधारण, वाॅर्ड क्र.५ सर्वसाधारण महिला, वाॅर्ड क्र. ६ अनुसूचित जाती महिला, वाॅर्ड क्र.७ सर्वसाधारण महिला, वाॅर्ड क्र. ८ सर्वसाधारण महिला, वाॅर्ड क्र. ९ सर्वसाधारण, वाॅर्ड क्र.१० अनुसूचित जमाती महिला, वाॅर्ड क्र. ११, १२, १३, १४ सर्वसाधारण, वाॅर्ड क्र. १५, १६ ओबीसी महिला, वाॅर्ड क्र. १७ सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाली आहे.
एकही महिला नव्हती : फुलंब्री अाणि सोयगाव येथे प्रत्येकी १७ पैकी ९ वाॅर्ड हे महिलासांठी राखीव झाले. मात्र आरक्षण सोडत वेळी दोन्ही ठिकाणी एकाही महिलेची उपस्थिती नव्हती. आतापर्यंत विविध निवडणुकातून ज्या महिलांनी पदे भोगली अशा महिलादेखील येथे उपस्थित नव्हत्या.
सोयगावात १७ पैकी ९ वाॅर्ड महिलांसाठी झाले राखीव
येथील नगर पंचायतीसाठी गुरुवारी तहसील कार्यालयात सोडत पद्धतीने चिठ्ठ्या टाकून वाॅर्डांसाठी आरक्षण काढण्यात आले. सिल्लोड उपविभागीय अधिकारी चुन्नीलाल कोकणी यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात गुरुवारी नगर पंचायतीच्या १७ वाॅर्डांसाठी चिठ्ठ्या टाकून बालिकेच्या हस्ते आरक्षण काढण्यात आले. या वेळी तहसीलदार नरसिंग सोनवणे, न.पं.चे मुख्याधिकारी संतोष आगळे उपस्थित होते. या वेळी आरक्षण निश्चित करताना महिलांना ५० टक्के आरक्षणाचा निकष लावण्यात आल्याने १७ पैकी ९ वाॅर्ड महिलांसाठी राखीव करण्यात आले आहे. यात वाॅर्ड १ व वाॅर्ड २- सर्वसाधारण, वाॅर्ड ३- अनुसूचित जमाती महिला राखीव, वाॅर्ड ४ -अनुसूचित जाती महिला राखीव, वाॅर्ड ५ व ६ -सर्वसाधारण, वाॅर्ड ७- ओबीसी महिला, वाॅर्ड ८- ओबीसी खुला, वाॅर्ड ९- सर्वसाधारण महिला, वाॅर्ड १०- अनुसूचित जमाती महिला, वाॅर्ड ११- सर्वसाधारण महिला, वाॅर्ड १२- ओबीसी महिला. वाॅर्ड १३- ओबीसी खुला, वाॅर्ड १४- सर्वसाधारण, वाॅर्ड १५- सर्वसाधारण महिला, वाॅर्ड १६- अनुसूचित जमाती पुरुष, वाॅर्ड १७- ओबीसी महिला असे आरक्षण काढण्यात आले आहे. अनेक ठिकाणी इच्छुक असलेल्यांचा हिरमोड झाल्याचे पाहावयास मिळाले. याप्रसंगी काँग्रेसचे हर्षल देशमुख, कदीर शहा, संदीप
काळे, अक्षय काळे, भाजपचे अनिल खरात, कैलास काळे, राम पठाडे, शिवसेनेचे दिलीप मचे, शिवकुमार कुल्ली, दिनेश हजारी, राष्ट्रवादीचे अॅड. योगेश पाटील आदी उपस्थित होते.