आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pleasment In Drought, Much Water In Farmers Borewell

दुष्काळात दिलासा, शेतक-याच्या बोअरला धो-धो पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - पाण्यासाठी मराठवाडा-अहमदनगर जिल्ह्यात सर्व पातळ्यांवर कडाक्याचे भांडण सुरू आहे. अशा परिस्थितीतही हिमायतनगर तालुक्यातील खडकी बाजार येथील शेतक-याच्या बोअरवेलला अक्षरश: कारंजे उडावे असे पाणी लागले.

खडकी येथील देवराव किसनराव बारडकर या शेतक-याकडे एकूण ७ एकर शेती होती. सर्व शेती कोरडवाहू, निसर्गाच्या भरवशावर असल्याने हाती काही उरत नव्हते. गेल्या तीन वर्षांत तर सतत दुष्काळ असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली. चार महिन्यांपूर्वी त्यांनी सात एकरपैकी २ एकर शेती विकली. शेती विकून आलेल्या पैशांतून त्यांनी कर्ज चुकते केले. प्रपंचासाठी काही पैसा ठेवला. शेतात सिंचनाशिवाय काही पिकणार नाही या जाणिवेने त्यांनी शेतात बोअरवेल खोदण्याचा निर्णय घेतला. बुधवारी सकाळी ६ वाजता शेतात बोअरवलची मशीन आणली. बोअरवेल खोदण्याला सुरुवात केल्यानंतर जवळपास २१० फूट खोदल्यानंतर अचानक पाण्याचा स्रोत उफाळून आला. बोअरवेलची मशीन चालवणेही कठीण झाले. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की, साडेसहा इंच पाइपलाइनच्या बाहेर पडलेल्या पाण्यातून २ तासांत एक एकर शेती भिजवण्यात आली. कोणत्याही विद्युत पंपाशिवाय किंवा अन्य कोणत्याही साधनाशिवाय झरा लागल्यासारखे बोअरवेलच्या पाइपलाइनमधून पाणी सुरू झाले. दुष्काळाची सर्वत्र ओरड असताना पाण्यासाठी लोकांना दाहीदिशा फिरण्याची वेळ आली असताना निसर्गाचा हा चमत्कार घडला.

स्वप्न पूर्ण होईल
हिरव्यागार शेताचे स्वप्न पाहिले. आजपर्यंत ते पूर्ण होईल असे कधी वाटले नाही. शेताने निराशाच केली; परंतु आता बोअरवेलला या दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात लागलेले पाणी पाहून हिरवे स्वप्न पूर्ण होईल अशी आशा वाटते. देवराव बारडकर, शेतकरी

हायड्रोस्टेटिक प्रेशर
वर्षानुवर्षे दगडामध्ये पाणी साठून राहिल्यानंतर त्या ठिकाणी हायड्रोस्टेटिक प्रेशर निर्माण होते. याला अर्टेशन अक्विफर असे म्हणतात. या पाण्याला वाट मिळाली की ते जोमाने बाहेर येते. हळूहळू दाब कमी झाला की ते पाणी कमी होत जाते. याला अर्टेसन कंडिशन असे म्हटले जाते. हे पाणी कितीही जास्त अथवा कमी असू शकते. एच.एम.संगनूर, वरिष्ठ भूवैज्ञानिक