आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Action On Agitators Wrong Sambhaji Raje Bhosale

मोर्चेकर्‍यांवरील पोलिसी दंडेली चुकीचीच - संभाजी राजे भोसले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला मोर्चा चुकीचा नव्हता. पोलिसांनी त्यांना नाहक मारहाण केली. हे चुकीचे आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षकांनी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. कारवाईनंतरच पुढील दिशा ठरवणार, अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज संभाजी राजे भोसले यांनी येथे दिली.
जालना शहरात छावा संघटनेच्या मोर्चेकरांवर पोलिसांनी केलेल्या दडपशाहीचा त्यांनी पत्रकारपरिषदेत निषेध नोंदवला. ते म्हणाले, पेालिसांनी आंदोलकांना पकडून मारणे हा प्रकार चुकीचाच आहे. आंदोलन अनेक जण करतात, मात्र असा पवित्रा पोलिसांनी घेणे हे चुकीचे आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर सर्व संघटनांनी शांतता आणि संयमाचीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे पोलिसांकडून संघटनांवर अशा पद्धतीने हुकुमशाही मार्गाने दडपशाही करणे अपेक्षित नाही. संघटनांनीही कायदा हातात घेऊ नये, अशा सूचनाही त्यांनी या वेळी कार्यकर्त्यांना दिल्या.
आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू या राज्यांत वाढीव आरक्षण दिले गेले आहे. तामिळनाडूत तर 75 टक्के आरक्षण आहे. महाराष्ट्रातच का दिले जात नाही ? आजच्या परिस्थितीत समाज दैन्य अवस्थेतून चालला आहे. त्यातच मराठवाड्याची परिस्थिती वाईट आहे. आत्महत्या करणारे सर्वात जास्त शेतकरी मराठा समाजाचे आहेत. आपल्याला कुठल्या एका जातीचे आरक्षण नको आहे. आरक्षण देताना पहिल्यांदा ओबीसीमध्ये समाविष्ट करून घ्या, त्यानंतरच आरक्षण द्या. कुठल्याही प्रकारे आणि कितीही टक्के द्या, परंतु आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचेही ते म्हणाले. यावेळी दत्ता घुले पाटील, भरत पाचफुले, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मनसे जिल्हाध्यक्ष रवी राऊत, विष्णू पाचफुले, भाऊसाहेब घुगे आदींची उपस्थिती होती.