आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमधील दगडफेकप्रकरणी अटकसत्र सुरूच; तीन जण ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी निषेधासाठी सोमवारी पुकारण्यात आलेल्या बीड बंददरम्यान झालेल्या दगडफेकीप्रकरणी पोलिसांनी सुरू केलेल्या अटक सत्रात मंगळवारी रात्री शिवाजीनगर पोलिसांनी आणखी तीन जणांना ताब्यात घेतले, तर सोमवारी रात्री शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चार जणांना चार दिवसांची पोलिस काेठडी सुनावली आहे.  
 
महापुरुषांचा अवमान करणाऱ्या विठ्ठल तिडकेवर कारवाई करावी व या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी पुकारण्यात आलेल्या बीड बंददरम्यान काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीतील काही तरुणांनी हुल्लडबाजी करत केलेल्या दगडफेकीनंतर शहरात तणाव निर्माण झाला होता. १४ ठिकाणी दगडफेकीनंतर पोलिसांनीही कठोर भूमिका घेत शहर ठाणे, शिवाजीनगर ठाणे, शिवाजीनगर पोलिसांत जवळपास दीडशे जणांवर गुन्हे नोंद केले होते.
 
यात सोमवारी रात्रीपासूनच पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या तरुणांची ओळख पटवून त्यांचे अटकसत्र सुरू केले होते. मंगळवारपर्यंत १८ जणांना अटक केली होती, तर मंगळवारी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसांनी दगडफेकप्रकरणी आणखी स्वप्निल पिंगळे, सागर जोगदंड व प्रदीप जाधव या तीन जणांना अटक केली आहे. दरम्यान, शहर पोलिस व पेठ बीड पोलिसांनी मात्र बुधवारी कुणालाही अटक केलेली नाही.   
 
सीसीटीव्हीचा फायदा   
पोलिसांच्या वतीने शहरातील चौकांमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची या तपासात चांगली मदत होत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. अनेक ठिकाणच्या चौकांचे सीसीटीव्ही फुटेज काढून त्यातून दगडफेक करणाऱ्या तरुणांची ओळख पटवण्यात येत आहे. अनेक अधिकाऱ्यांनी  व कर्मचाऱ्यांनी या प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही मोबाइलमध्ये केलेले आहे, तर विशेष शाखेच्या व्हिडिओ कॅमेऱ्यांमध्येही चित्रीकरण करण्यात आलेले असून त्याचीही मदत घेण्यात येत आहे.
 
चौघांना कोठडी
शिवाजीनगर पोलिसांनी सोमवारी रात्रीच अटक केलेल्या अमित काकडे, गणेश जगताप, संतोष कदम, अशोक बेंद्रे यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
बातम्या आणखी आहेत...