आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांमुळे मिळाले विद्यार्थ्यांना व्यासपीठ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दोन दिवस चाललेल्या युवा सांस्कृतिक महोत्सवात शहरातील अनेक विद्यार्थ्यांना कला सादरीकरणाची संधी मिळाली. पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर दत्तात्रय कराळे यांनी जनतेला सोबत घेऊन आतापर्यंत अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे पोलिस आणि जनतेमध्ये नाते निर्माण होत आहे.
पोलिस कवायत मैदानावर आयोजित युवा सांस्कृतिक महोत्सवात 13 महाविद्यालये आणि 1८ शाळांच्या विद्यार्थ्यांनी कला सादर केली. 13 व 14 जानेवारीला हा महोत्सव आयोजित केला होता. विद्यार्थ्यांनी कोळीगीते, शेतकरीगीते, नाटिका, चित्रपटातील गीते, लावणी यासह मनोरंजन आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले. स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन गटात प्रथम पारितोषिक रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाला, शालेय गटातून श्री श्री रविशंकर शाळेला मिळाले. पोलिस दलाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला पारितोषिके देण्यात आली. उस्मानाबादेत प्रशासनाच्या वतीने अनेक दिवसांनंतर कार्यक्रम झाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दत्तात्रय कराळे यांनी पोलिस कर्मचा-यांसाठी तणावमुक्ती, मनोरंजन, दिवाळी स्नेह मेळावा असे अनेक कार्यक्रम घेतले आहेत. कर्मचा-यांना ड्युटीपेक्षा अधिक वेळ करावे लागणारे काम व त्यातून निर्माण होणारा तणाव, यातून सुटका मिळावी यासाठी कराळे यांनी कार्यक्र म घेतले. त्यानंतर कर्तृत्ववान पोलिस अधिकारी, कर्मचा-यांचा सन्मान करण्यासाठी खास कार्यक्रम घेण्यात आला. पोलिस दलासह शहरातील अन्य विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांनी यावर्षी प्रथमच युवा सांस्कृतिक महोत्सव घेतला. या उपक्रमामुळे शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. सर्वांना सामावून घेण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी सुरू केलेल्या कार्यक्रमामुळे पोलिस आणि जनतेचे नाते अधिक दृढ होत आहे.
दुरावा संपला पाहिजे
पोलिस म्हणजे अन्य कोणी नाही, असे नागरिकांना वाटले पाहिजे. पोलिस आणि नागरिकांमधील दुरावा संपला पाहिजे. त्यांनी पोलिसांना मदत करावी, सर्वांनी एकमेकांबद्दल आपुलकीने वागल्यास समाजातील गुन्हेगारी संपायला वेळ लागणार नाही. कार्यक्रम हे माध्यम आहे, त्यामुळे सर्व स्तरातील नागरिक एकत्र येतात.
दत्तात्रय कराळे, पोलिस अधीक्षक