आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Go In Aurangabad, Nashik For Arresting Member Of Jatpanchayat

जातपंचायतीतील अकरा आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिस औरंगाबाद, नाशिकला रवाना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - जातपंचायतीने एका कुटुंबावर बहिष्कार घातल्याप्रकरणी लातुरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा 11 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हे सर्व आरोपी नाशिक आणि औरंगाबादेतील असून अशाच प्रकरणात ते तेथे अटकेत आहेत. लातूरच्या न्यायालयाने त्यांच्या अटकेचे वॉरंट बजावल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना होणार आहे.


मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील धामणगाव (ता. फुलंब्री ) येथील भटक्या विमुक्त जातीतील गणेश विठ्ठल धुमाळ (ह. मु. लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, 22 मे 2010 रोजी माझा लातुरातील शिवाजी जोशी यांच्या मुलीशी विवाह झाला. तेव्हापासून मी जातपंचायतीच्या धाकामुळे येथेच राहत आहे. पंचायतीचे 11 जण मला ‘तू पंचाच्या परवानगीशिवाय लातूरच्या पाहुण्यांशी लग्न कसे केले?’ तो पाहुणा जोशी जातीचा असल्याचे आम्ही मानत नाही. त्यामुळे सोयरिक मोड म्हणून माझ्यासह नातेवाइकांवर दबाव आणत आहेत. शिवाय आमच्या कुटुंबातील लग्न, मृत, श्राद्ध, दशक्रिया आदी विधीला औरंगाबादहून कोणीच येत नाही. आमचे नाव नातेवाइकांना लग्नपत्रिकेवर टाकण्यास जातपंचायतीने मज्जाव केला आहे. जर त्यांनी पत्रिकेवर नाव टाकले तर त्यांनाही बहिष्कृत करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, जातपंचायतीच्या सदस्यांनी 21 हजारांचा दंड भरून परत जातीत घेण्याचा आदेश दिला होता. आपण तो मानला नाही, असेही तक्रारीत धुमाळ यांनी नमूद केले आहे. धुमाळ यांच्या फिर्यादीवरून दिलीप शिंदे, दामोदर हिंगमिरे, काशीनाथ हिंगमिरे (तिघेही रा. टीव्ही सेंटर, औरंगाबाद), नारायण धुमाळ, लक्ष्मण शिंदे, भास्कर शिंदे, विनायक शिंदे, शिवाजी कुंभारकर, रामनाथ धुमाळ, भीमा धुमाळ, मधुकर कुंभारकर (सर्व रा.नाथ चौक, पंचवटी, नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व जणांवर नाशिक आणि औरंगाबाद येथे अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, सध्या ते पोलिस कोठडीत आहेत.


आज अटकेची शक्यता
शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्याने आणि आज रविवार असल्याने पोलिसांना त्यांच्या अटकेसाठी काही करता आले नाही. त्यामुळे सोमवारी येथील न्यायालयाने त्यांच्या अटकेसाठी ट्रान्सफर वॉरंट बजावल्यानंतर पोलिसांचे एक पथक नाशिक आणि औरंगाबादला जाणार आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात येणार आहे.
केशव लटपटे, पोलिस निरीक्षक, एमआयडीसी ठाणे, लातूर