आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिदरहून परळीला आलेला महेश पालकांच्या ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेश बिरादाला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले. - Divya Marathi
महेश बिरादाला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले.
परळी- होमवर्क पूर्ण करण्यासाठी आईने मारहाण केल्याने घरातून परळीला रेल्वेने आलेला बिदर येथील महेश बिरादार हा शाळकरी मुलगा रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांमुळे सुरक्षितपणे आई-वडिलांकडे जाऊ शकला. एखाद्या चित्रपटाप्रमाणे हा प्रसंग परळीच्या रेल्वेस्थानकावर घडला.

कर्नाटक राज्यातील बिदर येथील रहिवासी असलेले विलास बिरादार हे हैदराबाद येथे खासगी नोकरी करतात. त्यांचे कुटुंबीय बिदर येथे वास्तव्यास आहेत. त्यांना दोन मुले व मुलगी आहे. त्यांचा लहान मुलगा महेश बिरादार हा बिदर येथील शाळेत सहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. शाळेतून दिलेला होमवर्क पूर्ण करण्यासाठी आईने महेशला मारहाण केली. या मारहाणीचा राग मनात धरून महेश हा १५ जुलै रोजी रात्री घरातून निघून गेला. बिदर येथील रेल्वेस्थानकात आल्यानंतर त्याला परळीकडे जणारी साईनगर - शिर्डी ही रेल्वे दिसल्याने तो त्या रेल्वेत बसला. ही रेल्वे परळी येथील रेल्वेस्थानकात १६ जुलै रोजी रात्री दोन वाजता आली. परळी येथून परभणीकडे जाण्यासाठी इंजिन बदलण्यासाठी रेल्वेस्थानकावर जवळपास २० मिनिटे थांबली. याचदरम्यान महेश बिरादार हा शाळकरी मुलगा परळी रेल्वेस्थानकात उतरला. रेल्वेतून उतरल्यानंतर तो प्लॅटफॉर्मवर नंबर एकवर येऊन थांबला. रेल्वे निघून गेल्यावर काही वेळाने रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस उपनिरीक्षक सरोज कुमार यांनी महेश याला पाहिले. एकटा मुलगा असल्याचे पाहून त्यांनी मुलाची चौकशी केली. पोलिस चौकशी करत असल्याचे पाहून त्याला रडूच कोसळले. तेव्हा सरोज कुमार यांनी महेशला विश्वासात घेत चौकशी केली. महेशने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी बिदर येथील कुटुंबीयांशी संपर्क साधून सर्व माहिती दिली.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण
परळी रेल्वे पोलिसांनी माहिती दिल्यानंतर महेशचे कुटंुब दुसऱ्या दिवशी सायंकाळी परळी येथे आले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी महेशला त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. महेश मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना आनंद झाल्याचे दिसत होते.
बातम्या आणखी आहेत...