आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अामिरच्या चाहत्यांवर पोलिसांचा लाठीमार, वॉटर कपच्या बैठकीसाठी झाले होते आगमन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - सत्यमेव जयतेच्या पाणी फाउंडेशनअंतर्गत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी सिनेअभिनेता आमिर खान शुक्रवारी दुपारी एक वाजता अंबाजोगाईत दाखल झाला असता हजारो चाहत्यांनी येथील स्वाराती रुग्णालयात गर्दी केली. बैठकीला महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना प्रवेशबंदी करण्यात आली. भाजपचे पदाधिकारी सभागृहात अाधीच ठाण मांडून बसले असताना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पत्रकारांनाच कार्यक्रमस्थळी प्रवेश नाकारत बाहेर काढले आणि अामिर खानला पाहण्यासाठी जमलेल्या चाहत्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

पाणी फाउंडेशनमार्फत वॉटर कप स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील तीन तालुक्यांचा समावेश असून लोकसहभागातून जलसंधारणाची कामे सुरू आहेत. या कामांचा आढावा घेण्यासाठी अभिनेता अामिर खान हेलिकॉप्टरने अंबाजोगाईत आला. आमिर खानच्या दौऱ्याबाबत गुप्तता पाळली असली तरी त्याच्या हेलिकॉप्टरने शहरावर दोन घिरट्या मारल्यानंतर येथील चाहत्यांना आमिर खानच्या आगमनाची चाहूल लागली. तेव्हा चाहते रुग्णालयातील हेलिपॅडवर तसेच रक्तपेढीच्या सभागृहासमोर हजारोंच्या संख्येने जमले. आमिरच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. येथील काही पत्रकार व भाजपचे कार्यकर्ते अगोदरच सभागृहात ठाण मांडून बसले होते. दुपारी दीड वाजता बैठक सुरू होताच संयोजकांनी सभागृहात जर पत्रकार उपस्थित असतील तर त्यांनी बाहेर जावे, असे सांगितले. याच वेळी अामिरच्या वाहनाला चाहत्यांनी गराडा घातल्यामुळे पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी चाहत्यांवर लाठीमार केल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

अधिकारी उभे पदाधिकारी खुर्चीत : बैठकीसाठीच्या खुर्च्यावर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, अभिनेता आमिर, केजच्या आमदार संगीता ठोंबरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, सत्यजित भटकळ, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांची उपस्थिती होती. परंतु उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार शरद झाडके उभे होते.

प्रेसवाले नॉट अलाऊड
आमिर खान स्वारातीच्या रक्तपेढीतील सभागृहात प्रशासकीय बैठक घेणार असल्याने सभागृहाच्या प्रवेशद्वारावरच जिल्हाधिकारी नवलकिशोर राम खुर्ची टाकून बसले होते. प्रेसवाल्यांना 'नॉट अलाऊड' असे सांगत होते. परंतु कार्यक्रमस्थळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कुणी प्रवेश दिला, हा प्रश्न आहे. प्रशासकीय बैठकीशी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा काय संबंध, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला.
अंबाजोगाई शहरात आलेल्या अामिर खानने चाहत्यांना लांबूनच अभिवादन केले. छाया: अशोक कचरे
बातम्या आणखी आहेत...