आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबाब दडवणा-या एपीआयला कोठडी; विवाहितेने पेटवून घेतल्याचे प्रकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई- दारुड्या पतीला कंटाळून पेटवून घेतलेल्या विवाहितेच्या खटल्यात आरोपीला मदत करण्याच्या हेतूने मृत्यूपूर्व जबाब दोषारोपपत्रासोबत न जोडल्याच्या आरोपावरून केज पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक व सध्या तलवाडा येथे कार्यरत एस.ए. डोईफोडे यांना दोषी ठरवून सत्र न्यायालयाने 5 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

केज येथील श्रीदेवी प्रवीण निगोळे (20) या विवाहितेने पतीच्या त्रासाला कंटाळून 13 आॅक्टोबर 2010 रोजी रात्री पेटवून घेतले. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान पोलिस अमलदार एकाळ यांनी श्रीदेवी निगोळे यांचा मृत्यूपूर्व जबाब घेतला आणि केज पोलिसांना पाठवला होता. श्रीदेवी यांचा 18 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. एपीआय डोईफोडे यांनी आरोपीला मदत करण्याच्या हेतूने मृत्यूपूर्व जवाब दोषारोप पत्रासोबत न्यायालयात दाखल केला नाही. त्यानंतर न्यायालयाने नोटीस बजावूनही डोईफोडे न्यायालयात हजर राहत नव्हते.

दरम्यान, सहायक सरकारी वकिलांनी 5 मार्च रोजी डोईफोडे यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याचा अर्ज न्यायालयाला दिला. त्यानुसार 21 रोजी दुसरे सत्र न्यायाधीश आर.ए. गायकवाड यांनी डोईफोडेंचे लेखी म्हणणे व त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळून लावला आणि कलम 201, 204 अन्वये सहआरोपी केले.