आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस बदली होऊनही क्वार्टर सोडेनात; ९० जणांना नोटिसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - इतरत्र बदली होऊनही शासकीय निवासस्थान बळकावून बसलेल्या उस्मानाबाद येथील पोलिस वसाहतीतील ९० पोलिस कर्मचाऱ्यांना तातडीने घरे खाली करण्याचे अादेश नोटिसीद्वारे पोलिस मुख्यालयाने दिल्याने या पोलिस कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली आहे. एकीकडे शैक्षणिक वर्ष अर्ध्यावर असताना खासगी भाड्याचे घर शोधायचे कसे, या विवंचनेत ते आहेत.

उस्मानाबाद शहरात मुख्यालय व शहर ठाण्यातून इतरत्र बदली झालेल्या, परंतु अद्यापही कुटुंबीयांसह पोलिसांच्या शासकीय वसाहतीत राहणाऱ्या ९० पोलिस कर्मचाऱ्यांना अधीक्षक कार्यालयाने घरे खाली करण्याची नोटीस बजावली आहे. यातील अनेक पोलिस कर्मचाऱ्यांच्या उस्मानाबादेत जिल्हाभरात इतरत्र बदल्या होऊन दोन ते तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे.

परंतु शैक्षणिक तसेच जिल्ह्याचे ठिकाण म्हणून अनेकांनी नोकरी उस्मानाबादबाहेर सुरू केली, परंतु कुटुंब मात्र उस्मानाबादेतच शासकीय निवासस्थानामध्ये ठेवले. दरम्यानच्या काळात इतर ठिकाणावरून उस्मानाबादेत बदलून आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी शासकीय निवासस्थान मिळावे म्हणून मुख्यालयात अर्ज दिल्यानंतर सदरील प्रकार समोर आला. उस्मानाबादेत बाहेर खासगी घरातील भाड्यांचे दर शासकीय निवासस्थानांच्या दुप्पट ते चारपट आहेत. त्यातच पोलिस वसाहत मुख्यालयाजवळ तसेच मध्यवर्ती ठिकाणी असल्याने अनेकांची यासाठी मागणी आहे. परंतु निवासस्थानच रिकामे नसल्याने अखेर मुख्यालयाने सध्या ताबा असणारे कर्मचारी व त्यांचे नेमणुकीचे ठिकाण याची पडताळणी केल्यानंतर ९० कर्मचाऱ्यांची नेमणूक उस्मानाबाद शहराबाहेर असतानाही त्यांनी शासकीय निवासस्थान सोडले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना नोटीस बजाऊन तत्काळ निवासस्थान खाली करण्याचे आदेश दिले आहेत.

तुळजापूरमधील शासकीय निवासस्थानांचीही संख्या अपुरीच
: तुळजापूर येथे पोलिस ठाणे येथे एकूण ९३, तर मंदिर बंदोबस्तासाठी ६७ कर्मचारी नियुक्त आहेत. परंतु तुळजापुरात पोलिस वसाहतीमध्ये केवळ २८ निवासस्थाने आहेत. त्यामुळे येथेही मोठ्या प्रमाणात अडचणी असून त्यातच तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने येथील भाडेदर परवडत नसल्याने अनेकांनी उस्मानाबादेतच शासकीय निवासस्थानात आपल्या कुटुंबीयांना ठेवून स्वत: ये-जा करत आहेत.

५० रुपये प्रति चौरस मीटरने भाडे वसूल
नोटिसीचे पालन करून तत्काळ घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घर न सोडल्यास ५० रुपये प्रति चौरस मीटर या दराने भाडे वसूल करण्यात येईल. कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याने निवासस्थानावर ताबा असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली आहे.

...अन्यथा कारवाई
एखाद्या ठिकाणावरून इतरत्र बदली झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने शासकीय निवासस्थान रिकामे करून ते इतरांना उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. परंतु उस्मानाबादेत अनेकांच्या नेमणुका इतरत्र असतानाही निवासस्थान मात्र त्यांच्याच ताब्यात असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार ही नोटीस बजावण्यात आली असून अन्यथा कारवाई केली जाईल. - पंकज देशमुख, पोलिस अधीक्षक.
बातम्या आणखी आहेत...