आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोसळले ही घटना पोलिसांच्या लेखी ‘किरकोळ’च

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर कोसळून झालेला अपघात पोलिसांच्या दफ्तरी मात्र ‘किरकोळ’ म्हणून नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे एरवी लहान-मोठ्या अपघाताला वाहनचालकावर हयगय आणि निष्काळजीपणाचा ठपका ठेवून गुन्हा दाखल केला जातो, मात्र याची नोंद करताना कुणालाही जबाबदार धरण्यात आलेले नाही.  
 
निलंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघाताने गुरुवारचा दिवस गाजला. मराठीसह हिंदी भाषिक वृत्तवाहिन्यांनी दिवसभर या अपघाताच्या विविधांगी बातम्यांचा रतीब घातला. तर दुसरीकडे सोशल मीडियावरही याचीच चर्चा होती. शुक्रवारची सगळे वृत्तपत्रेही याच बातमीने रंगली आहेत. मात्र, या घटनेची नेमकी कशी नोंद करायची यावरून अख्ख्या पोलिस दलात चर्चा झाली. निलंगा पोलिस ठाण्याच्या अंमलदारापासून ते राज्याच्या पोलिस महासंचालकापर्यंत या विषयावर चर्चा झडल्यानंतर निलंग्याचे पोलिस निरीक्षक कल्याण सुपेकर यांनीच फिर्याद दिली अाणि ‘किरकोळ’ अपघात अशी नोंद ठाणे डायरीत करण्यात आली. त्यामध्ये हेलिकॉप्टरचे पाते लागून एका ट्रकची केबिन आणि एका घराची भिंत पडून प्रत्येकी अंदाजे ५० हजारांचे नुकसान झाले असावे, असे त्यात नमूद केले आहे. एरवी मात्र ज्याचे नुकसान झाले त्याच्याकडून लेखी तक्रार आल्याशिवाय अशा नुकसानीचा उल्लेख ‘एफआयआर’मध्ये केला जात नाही. या प्रकरणात नुकसान झालेल्या आणि जखमी झालेल्यांची ठाण्यात तक्रार अद्याप दाखल झालेली नाही.  
 
नुकसान नेमके किती?  
या अपघातात एकूण किती नुकसान झाले याची माहिती समोर आलेली नाही. विशेष म्हणजे महसूलसह इतर कोणत्याच खात्याने याबाबत शुक्रवारी सायंकाळपर्यंत काहीही कार्यवाही केली नव्हती. हेलिकॉप्टरच्या पात्यांमुळे महावितरणच्या तारा तुटल्या, पोल झुकला, त्याचे नुकसान किती झाले याबाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय तालेवार यांना विचारले असता त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना विचारावे लागेल, असे सांगितले. कार्यकारी अभियंता एस. आर. कुलकर्णी यांनी महसूलने पंचनामा केल्याचे सांगत हात वर केले. मात्र, खोदून विचारल्यानंतर १५-२० हजारांचे नुकसान झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला.  
 
नुकसान भरपाई मिळणार?  
वाहनांचा थर्ड पार्टी विमा असेल तर अपघातग्रस्त वाहन आणि जे जखमी झाले त्यांना विम्याची रक्कम मिळते. मात्र, या प्रकरणात शुक्रवारी सायंकाळपर्यंत तरी नुकसानीबाबत कोणत्याच खात्यामार्फत कसलीही प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झाल्यास तहसीलदारांमार्फत तातडीने मदत दिली जाते. मात्र, हेलिकॉप्टरचा अपघात नैसर्गिक आपत्ती नसल्यामुळे मदत देण्याचे अधिकार तहसीलदारांना नाहीत. मदत द्यायची झाल्यास खास बाब म्हणून ती द्यावी लागेल, अन्यथा हेलिकॉप्टरच्या विम्यातूनच ती मदत मिळू शकेल. याबाबत उपविभागीय अधिकारी भगवान आगे पाटील, तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याशी मात्र प्रयत्न करूनही संपर्क झाला नाही. त्यामुळे ट्रकचालक आणि ज्याचे घर पडले त्यांना मदत मिळणार की नाही? हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे.
 
2 पथकांनी केली पाहणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताची गंभीर दखल घेत हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या मुंबई, दिल्लीतील दोन पथकांनी शुक्रवारी निलंगा गाठले. दुपारी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन त्यांनी हेलिकॉप्टरची पाहणी केली.  मुंबईहून आलेल्या पथकाचे प्रमुख यशपाल आणि दिल्लीहून आलेल्या पथकाचे प्रमुख जोसेफ यांच्याकडे पाहणीच्या निष्कर्षाबद्दल माहिती विचारली असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला.
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, हेलिकॉप्‍टर अपघाताचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...