आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाला सक्तमजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीला परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे प्रश्न देण्याच्या निमित्ताने बोलावून बार्शी व उस्मानाबाद येथे लॉजवर मारहाण करून अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाला उस्मानाबाद येथील अप्पर सत्र न्यायाधीश एस. आय. पठाण यांनी सात वर्षे सक्तमजुरी व पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

याप्रकरणी ५ सप्टेंबर २००७ रोजी शहर पोलिस ठाण्यात पीडित तरुणीने फिर्याद दिली होती. आरोपी उपनिरीक्षकाला वाचविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने थेट गृहमंत्र्यांनीच यात लक्ष घालत गुन्हा दाखल करण्यास सांगून विशेष सरकारी विधिज्ञांची नेमणूक केली होती.

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निमित्ताने पीडित तरुणी व त्यावेळचे उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यातील कार्यरत पोलिस उपनिरीक्षक किशोर माणिक लवटे यांची ओळख झालेली होती. याचाच फायदा घेऊन उपनिरीक्षक लवटे याने पीडित तरुणीला परीक्षेसंदर्भात महत्त्वाचे प्रश्न देण्याच्या निमित्ताने बार्शी येथे गौरी लॉजवर बोलाविले. यावेळी तेथे अन्य तरुणीही असल्याचे खोटे सांगितले. त्यानंतर लॉजवर पीडितेला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. यावेळी सदरील तरुणीचे आक्षेपार्ह मोबाइल फोटोही उपनिरीक्षक लवटे याने घेतले. याच फोटोच्या आधारे त्याने तरुणीला दडपणाखाली ठेवून बदनामी करण्याची धमकी देऊन उस्मानाबादेत बोलाविले. उस्मानाबाद येथे बायपास मार्गावरील हॉटेल सिटीपॅलेस येथे नेऊन हत्याराने वार करून तिला जखमी करत अत्याचार केला. यामुळे बदनामीच्या भीतीपोटी तरुणीने विषारी ओषध पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न केला. परंतु, यातून शुद्धीवर आल्यावर आईने धीर दिल्याने याप्रकरणी तरुणीने ५ सप्टेंबर २००७ रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. परंतु, लवटे हा याच ठाण्यात कार्यरत असल्याने वरिष्ठ पोलिस अधिकारी लक्ष्मण वडजे यांनी ही तक्रार लपवून चालढकल केली. पीडित तरुणीने पोलिस अधीक्षक, अप्पर अधीक्षक, उपाधीक्षक यांच्याकडेही तक्रार केली. परंतु, कोणीच दखल घेत नसल्याने गृहमंत्र्यांकडे तक्रार केली. गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन स्वत: लक्ष घातले.
उच्च न्यायालयाकडूनही दखल
दरम्यान, याप्रकरणी तरुणीने उच्च न्यायालयात तत्कालीन तपास अधिकारी पोलिस निरीक्षक लक्ष्मण वडजे यांनी आरोपी हा पोलिस अधिकारी असल्याने त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केल्याची तक्रार केली. यामध्ये खरी फिर्याद न घेता खोटी कागदपत्रे व हेतूत: तपासामध्ये हलगर्जीपणा केल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी मान्य केली होती.
बातम्या आणखी आहेत...