आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

38 बालकांच्या शौच नमुन्यांची तपासणी;बालकाचा मृत्यूनंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - बीड जिल्ह्यातील कान्हापूर (ता. किल्लेधारूर) येथील रोहित शेळके या बालकाचा पोलिओमुळे मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. त्यामुळे कान्हापूर परिसरातील एक किमी अंतरावरील गावांत राहणा-या 38 बालकांचे शौच नमुने घेण्यात आले असून ते मुंबईतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. गणेश रामटेके यांनी दिली.


कान्हापूर गाव व परिसरातील शून्य ते 5 वर्षे वयोगटातील मुलांना नव्याने पोलिओचा डोसही देण्यात आला आहे. प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या 38 मुलांच्या शौच नमुन्यांचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे. त्याची एक प्रत केंद्र सरकारला, तर दुसरी प्रत लातूरच्या आरोग्य उपसंचालकांना पाठवली जाणार आहे. या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर केंद्र सरकार पुढील उपाययोजना करण्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतरच पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत.


पोलिओमुळे बालकाचा मृत्यू झाल्याने सरकारचे ‘पोलिओमुक्त भारत’चे स्वप्न भंगले आहे. पोलिओ मुक्तीसाठी आपणास जागतिक आरोग्य संघटनेमार्फत जागतिक बँकेडून कर्ज मिळते. त्यानुसार मोहीम राबवण्यात येते. परंतु बालकाच्या मृत्यूमुळे सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. मात्र, येथील डॉक्टर मंडळींच्या मतांनुसार रोहित शेळकेला दुर्मिळ असा टाइप-2 चा पोलिओ झाला होता.


हा आजार 10 लाख बालकांमागे एकाला होतो. सध्या जी मोहीम राबवण्यात येते ती टाइप-1 आणि टाइप-2 पोलिओ निवारणाची आहे.


रुग्णालयाने अधिकृतपणे कळवले नाही
शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रोहितचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत त्यासंदर्भातील सोपस्कार पूर्ण करण्याकडे येथील डॉक्टरांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे मृताच्या नातेवाइकाला मनस्ताप सहन करावा लागला. शिवाय पत्रकारांनाही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. यासंदर्भात उपसंचालक डॉ. गणेश रामटेके यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, रुग्णालयाने आम्हालाही अधिकृतरीत्या कळवले नाही. रात्री नऊ वाजता आम्हाला बाहेरून माहिती समजली. प्रभारी अधिष्ठाता डॉ. श्रीकांत गोरे यांनी तर माझाही फोन उचलला नाही.