आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरमध्‍ये पोलिओग्रस्त बालकाचा अखेर मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - धारूर येथील पोलिओग्रस्त रोहित शेळके (11 महिने) या बालकाचा शनिवारी मृत्यू झाला. रोहितचे शरीर लुळे पडले होते. उपचार सुरू असताना दुपारी अडीच वाजता त्याचा मृत्यू झाला. मात्र, लातूरच्या शासकीय रुग्णालयात तासभर त्याच्याकडे कुणीच लक्ष दिले नाही.


ऊसतोड कामगार असलेले बालकाचे वडील राजाभाऊ यांनी विनवण्या केल्यानंतर डॉक्टरांनी मुलाची तपासणी केली आणि तो मरण पावल्याचे सांगितले. दुपारी चारपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत शवविच्छेदन झाले नाही. रात्रीचे 10 वाजले तरी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला नव्हता. रोहितचे आई-वडील, आजोबा, मामा, काका दुपारपासून उपाशीपोटी शवविच्छेदन कक्षाबाहेर बसून होते. त्यांची साधी चौकशीही रुग्णालयाच्या अधिका-यांनी केली नाही. रात्री उशिरा राजाभाऊ शेळके यांनी शववाहिकेची शोधाशोध सुरू केली.


... वर पत्रकारांना बेजबाबदार प्रतिप्रश्न
ड्यूटीवर असलेल्या डॉक्टरांनी बेजबाबदार उत्तरे दिली. कसला पोलिओ, कोण मुलगा, इथे रोज दहा जण मरतात, कोणाकोणाची माहिती ठेवायची, असे प्रतिप्रश्न विचारून त्यांनी पत्रकारांना उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिष्ठाता दीप्ती डोणगावकर रजेवर आहेत. प्रभारी अधिष्ठाता डॉ. श्रीकांत गोरे आणि आरोग्य उपसंचालक डॉ. गणेश रामटेके यांना वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळाला नाही.


मेमध्ये आला होता लुळेपणा
रोहितला (रा. कान्हापूर, ता. किल्लेधारूर) 4 मे रोजी लुळेपणा आला होता. सुरुवातीस त्यास अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पोलिओ संशयित म्हणून जाहीर केल्यानंतर 13 व 15 मे रोजी या बालकाचे शौच नमुने तपासणीसाठी मुंबईला प्रयोगशाळेत पाठवले. तपासणीअंती त्यास व्हीडीपीव्ही टाइप-2 पोलिओची बाधा झाल्याचे आढळले. हे विषाणू दुर्मिळ परिस्थितीत जोखीमग्रस्त भागात व बालकामध्ये क्वचित प्रमाणात आढळतात. दरम्यान, या मृत्यूमुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.