बीड- शरद पवारांमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याची ताकद नाही. त्यांनी आता उसने अवसान आणू नये. आम्ही समोरून वार करतो, पाठीत नाही, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीड येथे केली.
रविवारी आयोजित महायुतीच्या सभेत ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, खासदार राजू शेट्टी, खासदार रामदास आठवले यांनी थोडे दिवस थांबावे. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेऊ. ज्यांनी गुन्हे दाखल केले त्यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. अशोकराव चव्हाण औरंगाबादेत काहीतरी बरळले. काँग्रेसची आता चळवळ राहिली नसून ती वळवळ आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीवाल्यासमोर आता आदराने नव्हे, शरमेने मान खाली जात आहे. शेतकर्यांनी आता आत्महत्या करू नयेत. महायुती तुमच्यासाठी आहे. काँग्रेसला गाडूून महायुतीचा झेंडा फडकावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत, असेही ते म्हणाले.
मला जन्मठेप दिली तर तुम्हाला फाशी : आठवले
इंदू मिलच्या आंदोलनप्रकरणी मला जर जन्मपेठ दिली, तर सहा महिन्यांनी सरकारला फाशी देईन. आम्ही काय आतंकवादी आहोत का? आम्ही देशावर प्रेम करणारे लोक आहोत. बाबासाहेबांनी आम्हाला विचारांची शिकवण दिली आहे. इंदू मिलच्या जागेसाठी लढणे आमचा हक्क आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची मागणी आमचीच आहे. परंतु राज्य सरकारने स्मारकाच्या मंजुरीसाठी खेळ मांडला आहे. दहा वर्षांत मंजुरी का मिळाली नाही? आबा, पोलिस सध्या तुमचे ऐकत नाहीत. कारण आता तुम्हाला सहा महिनेच राहिलेले आहेत, असा टोलाही आठवलेंनी लगावला.
राष्ट्रवादीचा महामेरू रोखू : जानकर
ओबीसींच्या आरक्षणाला मूठमाती देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. माढय़ाची जागा आम्हालाच मिळणार आहे. प्रस्थापित व्यवस्थेला हादरा देण्यासाठी आम्ही महायुतीत आलो आहोत. काँग्रेस व राष्ट्रवादीचा महामेरू रोखल्याशिवाय राहणार नाही, असे महादेव जानकर म्हणाले.
पाठीवर आसूड बसेल
इचलकरंजीच्या सभेत नेत्यांना मी आसूड भेट दिला होता. अजित पवारांनी त्याची चेष्टा केली आहे. तोच आसूड अजित पवार यांच्या पाठीवर बसल्याशिवाय राहणार नाही. उसाचा भाव मागणार्यांना ठार मारले. सदाभाऊ खोत, रामदास आठवले यांच्यावर खटले दाखल केले. ज्या पोलिसांना गुलामासारखे वागवता ते तुम्हाला पट्टय़ाने फोडल्याशिवाय राहणार नाहीत. सोलापूरच्या शेतकर्यांना कर्ज मिळत नाही. त्याचे कारण दिलीप सोपल आहे. आर. आर. पाटील यांनी हिंमत असेल तर सोपलला नीट करावे. - खासदार राजू शेट्टी
महाएल्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राष्ट्रवादी - काँग्रेसवर टीकास्त्र, बीडच्या सभेला तुफान गर्दी
तुमचा माज जनता उतरवेल
जनतेने वानर निवडून देऊ नये, वाघ निवडून द्यावा. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर खरा राजा आपल्याला मिळेल. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार अत्याचारी, दुराचारी आहे. जनतेचा विश्वास या सरकारवर राहिला नाही. अजित पवारांना जर माज चढला असेल तर जनता त्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष, भाजप