आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडोबांची गंमत ठरली लक्षवेधी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - जिल्हा परिषदेच्या दुस-या टर्ममधील निवडणुकीत काँग्रेसच्या 12 सदस्यांनी बंड केल्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत खळबळ उडाली होती. त्या 12 पैकी चार सदस्यांनी पुन्हा काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. विशेष म्हणजे मुलाखतींमध्ये या चौघांना पुन्हा बंडखोरी करणार का, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनीही साळसूदपणे ‘नाही’, असे उत्तर देऊन वेळ मारून नेली. काँग्रेस पक्षाच्या मुलाखतींमध्ये ज्या अनेक गमतीजमती घडल्या, त्यातील ही गंमत अधिकच लक्षवेधी ठरली. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी बंडखोरांवर काय कारवाई करायची याचा निर्णय प्रदेश पातळीवर प्रलंबित असल्यामुळे त्यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.
दुस-या टर्मसाठी लातूर झेडपीचे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडताना 12 सदस्यांनी बंडखोरी केली होती. त्यांनी भाजपशी हातमिळवणी करून अध्यक्षपद मिळवले होते. त्यांच्या पाठीमागे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर असल्यामुळे या 12 बंडखोरांवर पक्षस्तरावरून कोणतीच कारवाई झाली नाही. नव्याने निवडणूक लागल्यानंतर त्यातील रामदास चव्हाण, कुशावर्ता बेळ्ळे, राम गायकवाड आणि जलील देशमुख या
चौघांनी पुन्हा काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. त्यांच्यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या 830 जणांच्या मुलाखती पक्षनिरीक्षक आमदार कल्याण
काळे, धोंडीराम वाघमारे, जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे यांनी घेतल्या.
मुलाखतीत सगळ्यांना इतराला तिकीट दिले तर बंडखोरी करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. जर निवडून आलात तर पक्षासोबत निष्ठा ठेवणार की इतरांशी घरोबा करणार, असे प्रश्न विचारण्यात आले. गेल्या वेळी बंड करून या वेळी पुन्हा तिकीट मागायला गेलेल्या चौघांनाही हा प्रश्न विचारण्यात आला. त्या वेळी त्यांनी पुन्हा बंड करणार नसल्याचे साळसूद उत्तर दिले आणि पक्षनिरीक्षकांनीही मान डोलवून त्याला प्रतिसाद दिला. या मुलाखतीदरम्यान अनेक गमतीजमती झाल्या. कुणी नेत्यांसाठी तिळगूळ आणले, पत्नीला उमेदवारी मागण्यासाठी आलेल्यांनी मुलाखत माझीच घ्या, पत्नीला काही कळत नसल्याचा लकडा लावला. काही महिला तर लहान मुलांना कडेवर घेऊन
आल्या होत्या. मूल रडायला लागल्यानंतर एकीकडे त्याला समजावत दुसरीकडे मुलाखत देणे सुरू होते.
कुटुंबानेच मागितले तिकीट
झेडपीचे माजी अध्यक्ष मिठाराम राठोड यांच्या घरातील ते स्वत:, त्यांच्या पत्नी, मुलगा, सून अशा सगळ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून उमेदवारी मागितली आहे. सगळ्यांनाच तिकीट देणे शक्य झाले नाही तर आमच्यापैकी कोणाही एकाला तिकीट द्या; पण आमच्या घरातील एकाला तरी नक्की तिकीट द्या, असा आग्रह राठोड कुटुंबीयांनी धरला आहे.
‘होय, बंडखोर आले होते’
गेल्या वेळी बंड केलेल्यांपैकी चौघेजण मुलाखतीला आले होते. निवडणुका जिंकायच्या असल्यामुळे तो मुद्दा संपल्याचा निर्णय जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या वेळेसचे बंडखोर असे आता आम्ही त्यांना समजत नाही. त्यांना उमेदवारी द्यायची की नाही याचा निर्णय प्रदेश पातळीवरच घेतला जाणार आहे.
व्यंकट बेद्रे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस, लातूर

निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर...
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये बंडखोरीला उधाण आले आहे. भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक फटका बसला असून अहमदपूर तालुक्यातील निम्म्यापेक्षा जास्त नेते-कार्यकर्ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत. जळकोट तालुक्यातील अख्खी मनसे काँग्रेसमध्ये दाखल झाली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक ताकद असलेल्या काँग्रेसला अद्याप बंडखोरीची लागण झाली नसली तरी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झाल्यानंतर तिकीट मिळाले नाही तर अनेकजण बंडाचा पवित्रा घेऊ शकतात, अशी स्थिती आहे. जिल्ह्यात काँग्रेसनंतर भाजपची सर्वाधिक ताकद होती. झेडपीमध्येही काँग्रेसच्या 32 जागांपाठोपाठ भाजपकडे 17 जागा होत्या. मात्र, निवडणुकांचा बिगुल वाजताच मोठ्या प्रमाणावर पक्षांतराचे सत्र सुरू झाले आहे.