आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता कारवाईला मंगळवारचा मुहूर्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित न करणार्‍या कारखान्यांना सील लावण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी पी. एल. सोरमारे यांनी गुरुवारी दिले होते. त्यानुसार तहसीलदार कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी कारवाई केली जाणार होती. मात्र, आता 21 ऑगस्ट रोजी पोलिस बंदोबस्तात आठ कारखान्यांवर ही कारवाई होणार आहे.

जालना एमआयडीसीमधील स्टील उत्पादक कारखान्यातून मोठय़ा प्रमाणात धूर बाहेर पडतो. या धुरावर नियंत्रण यावे व धुराचे प्रमाण कमी व्हावे, म्हणून जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी या कंपन्यांना नोटिसा बजावून धूर कमी करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले होते. मात्र, मुदतवाढ दिल्यानंतरही यासंदर्भात पाच कंपन्यांनी ही यंत्रणा कार्यान्वित केली नाही, तर तीन कंपन्यांनी त्यांच्याकडे असलेल्या दोन भट्टय़ांपैकी प्रत्येकी एका भट्टीवर ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यामुळे पाच कंपन्या पूर्णपणे सील केल्या जाणार आहेत, तर तीन कंपन्यांच्या प्रत्येकी एका भट्टीला सील लावले जाणार आहे. 21 ऑगस्ट रोजी ही कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदार जे. डी. वळवी यांनी दै. ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

दरम्यान, याच औद्योगिक वसाहतीतील नीलेश स्टील, भाग्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, गीताई, मेटारोल्स, एस.आर.जे. पित्ती आणि माऊली स्टील या कारखान्यांनी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
कारवाईची पार्श्वभूमी - मार्च महिन्यात जिल्हा प्रशासनाने एमआयडीसीतील 55 कारखान्यांना प्रदूषण थांबवण्याचे आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या कारखानदारांनी यासंबंधी केलेल्या उपाययोजनांबाबत तत्कालीन उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे म्हणणे सादर केले होते. त्यानंतर 4 एप्रिल 2012 रोजी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी 31 मे 2012 पर्यंत प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करावी, असे आदेश दिले होते. मात्र, तेव्हा 11 कंपन्यांनी चेन्नई येथील इंडोफिन कंपनीकडे यासंबंधीची यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम दिल्याचे सांगितले होते. तामिळनाडू राज्यात मोठय़ा प्रमाणात भारनियमन होत असल्याने ही यंत्रे तयार करण्यास उशीर होत असल्याने कारखानदारांना 2 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. 31 जुलै रोजी ही मुदत संपली असल्याने आता सील लावण्याची कारवाई केली जाणार आहे.
पोलिस बंदोबस्तानंतरच कारवाई - अंबड रोडवर जमावाने ट्रक पेटवल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली, तर दुसरीकडे सध्या शहरातही मोठय़ा प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे एमआयडीसीमध्ये कारवाई करण्यास पोलिस बंदोबस्त मिळू शकला नाही. मंगळवारी पोलिस बंदोबस्तानंतरच ही कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदार जे. डी. वळवी यांनी सांगितले.
यांच्यावर होणार कारवाई - जालना एमआयडीसीतील भद्रामारुती, मत्स्योदरी स्टील, राजमुखा स्टील, रिजेंट स्टील, सप्तशृंगी अँलॉय या कंपन्यांना सील लावले जाणार आहे, तर ओम साईराम, सिद्धिविनायक आणि कालिका या कंपन्यांनी त्यांच्याकडे असलेल्या दोन भट्टय़ांपैकी एका भट्टीवर ही यंत्रणा कार्यान्वित केलेली नाही. त्यामुळे त्या कंपन्यांची एक भट्टी सील केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने त्यांना नोटिसा बजावल्या आहेत.