आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदूषणामुळे जालना परिसरातील 55 कारखान्यांना नोटिसा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - जालना-औरंगाबाद महामार्गाला लागून असलेल्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत कार्यरत रि-रोलिंग मिल्समधून निघणा-या धुरामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आल्याप्रकरणी 55 कारखान्यांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 21 जानेवारी सकाळी 11 वाजेपर्यंत उपविभागीय दंडाधिकारी यांनी नोटिशीचे लेखी स्पष्टीकरण मागवले आहे.
जालना शहराची ओळखच येथील स्टील व बियाणे उद्योगामुळे आहे. शहराच्या पश्चिमेला अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत रि-रोलिंग मिल्स चालतात. शहराच्या अगदी जवळच असलेल्या या कारखान्यांमधून निघणा-या धुरामुळे सर्वसामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात आल्याचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेले आहे. या कारखान्यांविरुद्ध सार्वजनिक उपद्रव करीत आहात म्हणून फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 133 अन्वये कारवाई का करण्यात येऊ, नये असा इशारा देण्यात आला आहे. यासंबंधी लेखी स्पष्टीकरण, प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांचे प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी कारखान्यांनी केलेली कार्यवाही, मागील वर्षात केलेले उत्पादन व त्यासाठी वापरलेले कोळसा व इतर साहित्य, स्फोटक परवाना, अतिसंवेदनशील रसायन साठा परवाना यांचा संपूर्ण तपशील मागवण्यात आला आहे.
अहवाल सादर
आमच्या कार्यालयाकडून कारखान्यांची नियमित तपासणी होत असते. प्रदूषण करणा-या 13 रि-रोलिंग मिल्सचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. रोलिंग मिल्समधून निघणा-या धुरामुळे प्रदूषण होते. यासाठी अशा कारखान्यांनी प्रदूषण नियंत्रित करणारी यंत्रणा बसवली पाहिजे.
डी. एस. बिराजदार, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, औरंगाबाद.