आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटाक्यांमुळे आजारी पडणाऱ्यांत ६० टक्के बालके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- फटाक्यांमुळे आजारी पडणाऱ्या रुग्णांमध्ये ६० टक्के प्रमाण १२ वर्षांखालील बालकांचे असते. तसेच ध्वनिप्रदूषणामुळे आरोग्याची हानी होते. त्यामुळे प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केले आहे.

जिल्ह्यात दिवाळीची धूम सुरू झाली आहे. नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु सणासुदीच्या काळात काही अनुचित घटना घडू नये म्हणून खबरदारी घेणे आवश्यक आहे. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ध्वनी, वायू आणि जलप्रदूषण हाेते. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्राण्यांनाही त्रास होतो तसेच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करणे गरजेचे आहे.

फटाक्यांमुळे आग लागून अपघात तर होतातच; पण कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांमुळे जुन्या इमारतींना तडे जाण्याची शक्यता असते. घराचे प्लास्टर खिळखिळे होते. विजेचे बल्ब जळतात वा पडतात. रुग्णालयातील नवजात बालके, रुग्णांना फटाक्यांच्या आवाजाचा विलक्षण त्रास होतो. मोठ्या फटाक्यांमुळे कायमचा बहिरेपणा येण्याची शक्यता असते. कानातील पेशी एकदा मृत झाल्या की पुन्हा निर्माण होत नाहीत. डोकेदुखी, रक्तदाब, हृदयविकार यासारखे विकार वाढतात. श्वसनमार्गाचे आणि फुप्फुसाचे विकार बळावतात. गर्भवती महिलांना अपाय होतो. तसेच देहातील तमोगुणी स्पंदनांच्या संवर्धनामुळे मन:पटलावर विपरीत परिणाम होऊन अनावश्यक तसेच विकल्पयुक्त विचारांची निर्मिती झाल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडते.
फटाके फोडल्यानंतर त्यातून विषारी धूर बाहेर पडतो. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत दम्याच्या रुग्णांत वाढ होते. वातावरणात पसरणारा हा विषारी वायू आरोग्याला हानीकारक असतो. फटाक्यांमुळे केवळ पैशाचा अपव्यय होतो असे नाही तर कचरा, धूळ आणि धूर अशा गोष्टी निर्माण होतात. महाराष्ट्रात फटाक्यांची उलाढाल १०० कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांचा धूर हवेत सोडणे योग्य होणार नाही.

काय करावे?
फटाक्यां एेवजी पुस्तके किंवा आरोग्यदायी खाद्यपदार्थ घ्यावेत. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. फटाके उडवायचेच असल्यास फक्त मैदानी फटाके वापरावेत. कमी आवाजाचे साधे स्वस्त फटाके उडवावेत. अधिकृत, नामांकित फटाके खरेदी करावेत. एका वेळी एकाच व्यक्तीने फटाके उडवावेत. शरीराच्या लांब फटाके उडवावेत. अनार, चक्रीसारखे फटाके मोकळ्या प्रशस्त जागेत उडवावेत.

मुले फटाके वाजवणार नाहीत यासाठी शालेय स्तरावर शिक्षकांनी मुलांना सांगणे आवश्यक आहे. पालकांनीच पाल्यांचे फटाके फोडण्याविषयी प्रबोधन करावे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालासंदर्भात रात्री १० ते सकाळी या वेळेत फटाके वाजवणे अपराध असल्याची जाणीव ठेवावी. फटाके उडवण्याऐवजी ते पैसे सत्कारणी लावावेत.
बातम्या आणखी आहेत...