आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एरंडीच्या बिया खाल्ल्याने 19 विद्यार्थ्यांना विषबाधा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - एरंडीच्या बिया खाल्ल्यामुळे 19 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार जालना तालुक्यातील निरखेडा येथे घडला. यापैकी 15 विद्यार्थ्यांवर जिल्हा रुग्णालयात, तर चार विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रताप जाधव यांनी सांगितले. दरम्यान, विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याची गेल्या काही दिवसांतील तिसरी घटना आहे.


तालुक्यातील निरखेडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना मंगळवारी दुपारी मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. काही वेळेतच त्रास होत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत जाऊन 19 वर पोहोचली. त्यानंतर ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या मदतीने या विद्यार्थ्यांना तातडीने विरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्याची तयारी करण्यात आली. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या मदतीने 15 विद्यार्थ्यांना जालना जिल्हा रुग्णालय व चौघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या विद्यार्थ्यांची तपासणी करून डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रताप जाधव यांनी सांगितले.

महिनाभरातील तिसरी घटना
यापूर्वी 2 जानेवारी रोजी अंबड तालुक्यातील रुई येथील जिल्हा परिषद शाळेतील 13 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी मुख्याध्यापक शेषराव जाधव यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर 21 जानेवारी रोजी राजूर येथील जिल्हा परिषद शाळेतील 17 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणाचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसला तरी एरंडीच्या बिया खाल्ल्यामुळेच विषबाधा झाल्याची शक्यता आहे.