आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात सिद्धिविनायक ट्रस्टकडून १०२ डायलिसिस यंत्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - गरीबरुग्णांच्या मदतीसाठी मुंबईच्या सिद्धिविनायक ट्रस्टकडून राज्याच्या आरोग्य विभागाला १०२ डायलिसिस मशीन दिल्या जाणार आहेत. राज्य शासन नंतर या मशीन मुंबई आणि उपनगर वगळता ३४ जिल्ह्यांमधील जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांना त्याचे वाटप करणार असल्याची माहिती सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

डायलिसिस मशीन नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होते. त्यातच काही शासकीय रुग्णालयात मशीन उपलब्ध असले तरी रुग्णांची संख्या जास्त असल्यास गैरसोय होते. ही अडचण लक्षात घेऊन सिद्धिविनायक ट्रस्टने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला १०२ मशीन देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला ट्रस्टच्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी मिळाली असल्याची माहिती अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी दिली. ट्रस्टने अशा प्रकारे १३४ मशीन राज्य सरकारला देण्याची तयारी दाखवली होती. मात्र, काही रुग्णालयात यासंबंधीचे तंत्रज्ञ नाहीत, त्यामुळे तंत्रज्ञ असलेल्या ठिकाणीच मशीन दिले जाणार असल्याचे राणे म्हणाले. याशिवाय ट्रस्टकडून मुंबईत एक डायलिसिस संेटर चालवले जाते. येथे २१ मशीन उपलब्ध आहेत. त्या माध्यमातून दररोज ४२ रुग्णांना उपचार दिले जातात, अशी माहिती त्यांनी दिली. वैद्यकीय आणि शैक्षणिक मदतीशिवाय राज्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांसाठी ट्रस्टने ३४ कोटी रुपये दिल्याचे राणे यांनी याप्रसंगी सांगितले. या वेळी सिद्धिविनायक ट्रस्टचे विश्वस्त प्रवीण नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश शिंदे, उद्योजक शिवरतन मंुदडा यांची उपस्थिती होती.

गरजूंना पदवीपर्यंतची पुस्तकेही
सिद्धिविनायकट्रस्टकडून पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तके िदली जातात. त्यासाठी मुंबई, मुंबईलगतची उपनगरे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागातून मोठ्या प्रमाणात अर्ज येतात. मात्र, मराठवाडा आणि विदर्भातून पुस्तकांची मागणी करणाऱ्या विद्यार्थी आणि संस्थांचे प्रमाण कमी आहे. पुस्तकांसाठी विभागवार निधीची तरतूद केली जाते. मात्र, मागणी नसल्याने या भागासाठी असलेला निधी तसाच राहतो तर इतर विभागासाठी अतिरिक्त तरतूद करावी लागते. त्यासाठी आम्ही मराठवाडा, विदर्भातील अनेक संस्था, प्राचार्य यांना अावाहन केले. मात्र, या भागातून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांनी किंवा मुख्याध्यापक, प्राचार्यांनी ट्रस्टला संपर्क केल्यास मागणीनुसार पुस्तके दिली जातील. नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांनीही ट्रस्टकडे संपर्क केल्यास त्यांनाही पुस्तके उपलब्ध करू दिले जातील, असे राणे यांनी या वेळी सांगितले.

१० दिवसांत वैद्यकीय मदत
गरीबरुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी ट्रस्टकडून २५ हजार रुपयांपर्यंतची मदत दिली जाते. त्यासाठी रुग्णांना रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वैद्यकीय खर्चाच्या अंदाजपत्रकासह संस्थेकडे अर्ज करावा. अर्ज प्राप्त होताच ट्रस्टकडून १० दिवसांत मदत दिली जाते. सिद्धिविनायक ट्रस्टशिवाय आणखी काेणत्या संस्थांकडून मदत मिळू शकेल याबाबतही गरजू रुग्णांना माहिती देतो, असे नरेंद्र राणे यांनी सांगितले.