आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवंत रुग्णाला घोषित केले मृत, मात्र पोस्टमॉर्टेमपूर्वी तो उठून बसला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार घेणार्‍या एका रुग्णास बेजबाबदारपणे मृत घोषित केले खरे, परंतु शवविच्छेदन करण्यासाठी नेताना तो जाग्यावरच उठून बसला. हा प्रकार 2 जुलैच्या रात्री घडला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा संताप व्यक्त केला जात आहे.
नांदेड- बंगळुरू एक्स्प्रेसमधून प्रवास करणारी अंदाजे 50 वर्षे वयाची एक व्यक्ती शनिवारी दुपारी लातूररोडजवळ रेल्वेतून पडल्याने जखमी झाली होती. त्यानंतर चाकूर पोलिसांनी त्या व्यक्तीला लातूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार चालू केले, परंतु जखमी व्यक्ती उपचारास प्रतिसाद देत नाही म्हणून डॉक्टरांनी रात्री 1 वाजून 35 मिनिटांनी त्याला मृत घोषित केले. पुढील प्रक्रियेसाठी डॉक्टरांच्या अहवालावरून गांधी चौक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यास सांगण्यात आले, पण मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यात काही तास गेले. तरीही त्याची ओळख पटली नाही. शेवटी शवविच्छेदन करण्याअगोदर पंचनामा करण्यासाठी ड्यूटीवरील जमादार रणझुंजार तेथे गेले. त्यावेळी रणझुंजार यांना धक्काच बसला. मृत व्यक्ती अक्षरश: उठून बसली होती.! हा प्रकार जमादार रणझुंजार यांनी डॉक्टरांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांना झालेली चूक लक्षात आली. मृत घोषित केलेला रुग्ण सध्या याच रुग्णालयात वॉर्ड. क्र. 17 मध्ये उपचार घेत असून, त्याची प्रकृती चांगली आहे. जखमी रुग्णास मृत घोषित करणार्‍या येथील डॉक्टरांच्या हालगर्जीपणाबद्दल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
‘त्या’ व्यक्तीनेच सांगितली ओळख
मृत घोषित केलेली व्यक्ती पूर्ण शुद्धीवर आहे. त्यांनी आपली ओळख सांगितली. त्यानुसार त्यांचे नाव हिरालाल माणिकलाल पतीलिया (50, रा. धामणगाव, जि. अमरावती) आहे. त्यांनी आपली मुलगी लक्ष्मीबाई आणि मुलगा राजेश यांची नावेही सांगितली आहेत. पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांना निरोप दिला असून ते लातूरकडे निघाल्याची माहिती आहे.