आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लुटणा-यांच्या हातात सत्ता देणार का, उद्धव ठाकरे यांचा परभणीत सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - एका बाजूला जनतेला लुटणा-या आणि दुस-या बाजूला महाराष्ट्राचे लचके तोडणा-यांकडे महाराष्ट्राची सत्ता देणार का, असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी परभणीच्या जाहीर सभेत केला. आपल्या संपूर्ण भाषणाचा त्यांनी रोख भाजपवरच ठेवला. केंद्रात सत्तेच्या खुर्चीवर बसण्यासाठी शिवसैनिक लागतो, आता राज्यात का चालत नाही, असेही ठाकरे म्हणाले.

स्टेडियमवरील जाहीर सभेत ठाकरे म्हणाले. राज्यात दुष्काळ असताना मोदी सरकारने काश्मिरात दाखवलेली माणुसकी मराठवाड्यातील शेतक-यांसाठीही दाखवावयास हवी होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर हिंदुत्वाशी असलेले नाते भाजपने तोडले. ही वृत्ती म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो, अशीच आहे. शिवजयंती साजरी न करणारे आज छत्रपतींचा आशीर्वाद मागत आहेत. आजही हिंदुत्वाची गरज असून ओवेसीचे विष येथे वळवळणार असेल, तर ती मस्ती शिवसेना सहन करणार नाही, असा इशारा ठाकरेंनी दिला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या स्वाभिमानाच्या शिकवणीमुळे शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही, उलट सेनाप्रमुखांच्या एक पाऊल पुढेच नेऊन दाखवणार, असेही ठाकरे म्हणाले. मोदींची लाट असेल, तर आठ सभा कशासाठी, दुष्काळ असताना महाराष्ट्र दिसत नाही तर निवडणुकीसाठी अख्खे मंत्रिमंडळ राज्यात येत आहे. दोन्ही काँग्रेसने राज्याचे वाटोळे केले असताना भाजपही त्याच मार्गावर चालला असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.
( छायाचित्र : परभणी येथील जाहीर सभेत बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर बोलावून दोन बालकांना आपल्या ई-शिक्षणाच्या प्रकल्पाची माहिती दिली.)