आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratap Patil Chikhalikar News In Marathi, Divya Marathi

चिखलीकरांनी उचलले शिवसेनेचे ‘धनुष्य’, मतदारसंघावर पुन्हा पकड मिळवण्यासाठी डावपेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - काही दिवसांपूर्वीच राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले जिल्ह्यातील माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर आता विधानसभेला नव्या पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची खात्री नसल्याने मंगळवारी शिवसेनेत डेरेदाखल झाले. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेनेला कितपत बळ मिळेल, याबद्दल साशंकता असली तरी काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची डोकेदुखी मात्र वाढणार, हे निश्चित

अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक व दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे समर्थक अशी चिखलीकरांची ओळख. दोन वर्षांपूर्वीच त्यांनी राष्‍ट्रवादीत प्रवेश केला. कंधार- लोहा मतदारसंघ त्यांचे कार्यक्षेत्र. राष्‍ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शंकरअण्णा धोंडगे यांनी गेल्या वेळी तेथून चिखलीकरांचा पराभव केला. आताच्या निवडणुकीत धोंडगे यांची उमेदवारी कापून राष्ट्रवादी आपल्याला उमेदवारी देईल अशी चिखलीकरांची अपेक्षा होती. त्यामुळेच ते राष्‍ट्रवादीत दाखलही झाले होते. मात्र निवडणुकीच्या तोंडावर तशी शक्यता दिसत नसल्याने अखेर चिखलीकरांनी शिवसेनेत प्रवेश केला. लोहा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेकडे असल्याने त्यांनी या पक्षाला पसंती दिली. त्यामुळे या मतदारसंघात आता पुन्हा धोंडगे विरुद्ध चिखलीकर असा सामना रंगणार आहे.

पक्ष बदलले तरी प्रतिस्पर्धी कायम
2004 च्या निवडणुकीत चिखलीकरांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. मात्र अशोक चव्हाणांच्या विरोधामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत राष्‍ट्रवादीचे धोंडगे यांच्यावर विजय मिळवला. मात्र त्यानंतर आघाडी सरकारलाच अपक्ष म्हणून पाठिंबा जाहीर केला. 2009 मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. मात्र तेव्हाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार असूनही चिखलीकरांना उमेदवारी मिळाली नाही. म्हणून त्यांनी पुन्हा अपक्ष म्हणून धोंडगे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यात ते पराभूत झाले. या निवडणुकीतही पुन्हा परंपरागत लढत होणार आहे. परंतु या वेळी ही लढत आघाडी विरुद्ध युती अशी राहणार आहे. उमेदवार मात्र कायम आहेत.

अशोक चव्हाणांची डोकेदुखी वाढली
चिखलीकरांच्या रूपाने जनाधार असलेला एक प्रबळ नेता शिवसेनेला मिळाला. ते कट्टर अशोक चव्हाण विरोधक आहेत. त्यांच्या शिवसेनेत जाण्याने चव्हाणांची मात्र डोकेदुखी वाढणार, हे निश्चित आहे.

शिवसेनेत नाराजी
लोहा मतदारसंघातून शिवसेनेचे गतवेळचेच उमेदवार प्रा. मनोहर धोंडे यंदाही इच्छुक आहेत. या मतदारसंघात लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे. चिखलीकरांच्या पक्षप्रवेशाला जिल्हास्तरीय नेते अनुकूल असले तरी धोंडे यांचा मात्र विरोध आहे. लोहा नगर परिषदेत मनसेची सत्ता आहे. माजी आमदार रोहिदास चव्हाण यांचेही हेच कार्यक्षेत्र आहे. त्यांचे जावई व शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे चिरंजीव मुक्तेश्वर धोंडगे या वेळी महायुतीकडून इच्छुक होते. मनसेही या मतदारसंघातून उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वेळी लोह्यात बहुरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता चिखलीकरांनी महायुतीची हवा पाहून शिवसेनेचे धनुष्य हाती घेतले तरी अचूक निशाणा साधण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असेल.

धवलसिंह शिवसेनेत
मुंबई । सोलापूर जिल्ह्यातील राष्‍ट्रवादीचे दिग्गज नेते खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धवलसिंह यांनीही मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांचे स्वागत केले. राज्यमंत्री प्रतापसिंह यांचे चिरंजीव असलेल्या धवलसिंह यांना माढा किंवा करमाळा येथून तिकिट दिले जाईल, असे सांगितले जाते. त्यामुळे राष्‍ट्रवादीसमोर घरातूनच आव्हान उभे राहिले आहे.