आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनोग्राफीसाठी गरोदर महिला 7 तास रुग्णालयात ताटकळत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - येथील सामान्य रुग्णालयात गरोदर महिलांची सोनोग्राफी करण्यासाठी आलेल्या सुमारे 150 महिलांना सकाळी 8 ते दुपारी 3 असे 7 तास ताटकळत ठेवण्यात आले. दुपार उलटून गेली तरी सोनोग्राफी होत नसल्याने संतप्त महिलांनी जाब विचारण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांना घेराव घातला. महिलांची संख्या पाहताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बोरसे यांनी परिस्थितीला सामोरे जाण्याऐवजी चक्क कार्यालयातूनच पलायन केले.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यासह दर बुधवारी सोनोग्राफीही मोफत केली जाते. गेल्या 15 दिवसांपासून मानधन तत्त्वावर नियुक्त करण्यात आलेला सोनोग्राफी तज्ज्ञ नियमित येत नसल्याने बुधवारी महिलांची एकच गर्दी उसळली. सुमारे 150 महिला बुधवारी सकाळी 8 वाजेपासूनच रांगेत उभ्या राहिल्या; परंतु सोनोग्राफी तज्ज्ञ डॉ. राजेश पवार हे 2 वाजून गेले तरी आले नसल्याने महिलांचा संताप अनावर झाला आणि महिलांनी डॉ. हेमंतकुमार बोरसे यांचे दालन गाठले. महिलांनी जाब विचारताच डॉ. बोरसे यांनी कोणतेही उत्तर न देता दालनातून चक्क पलायन केले. त्यानंतर अन्य डॉक्टरांनी सोनोग्राफी तज्ज्ञाला फोन करून तातडीने रुग्णालयात येण्याची विनंती केली. डॉ. पवार दुपारी 3 वाजता रुग्णालयात आल्यानंतर सोनोग्राफी करण्याचे काम चालू झाले; परंतु तोवर बहुतांश महिला निघून गेल्या होत्या. झालेल्या प्रकाराबद्दल डॉ. बोरसे यांना विचारणा केली असता भेदरलेल्या स्वरात मला काहीच माहीत नसल्याचे सांगून त्यांनी वेळ मारून नेली, तर नंतर सोनोग्राफी करण्याचे सुरू झाल्यावर त्यांनी महिलांना दोष दिला.

दोन वर्षांपासून सोनोग्राफी तज्ज्ञाची जागा रिक्त
दोन वर्षांपासून सामान्य रुग्णालयातील सोनोग्राफी तज्ज्ञाची जागा रिक्त आहे. सामान्य रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्रात मानधन तत्त्वावर खासगी डॉक्टर नियुक्त केले जातात. गेल्या वर्षी या पदासाठी आरोग्य विभागाने जाहिरात दिली होती, परंतु कमी पगारामुळे एकही डॉक्टर मुलाखतीसाठी आला नाही. तज्ज्ञ नसल्याने रुग्णालयातील केंद्र मरणासन्न झाले असून त्यावर विसंबून असलेल्या गरोदर महिलांना हाल सहन करावे लागत आहेत.

सोनोग्राफी तज्ज्ञ टिकतच नाही
‘रुग्णालयात कायमस्वरूपी सोनोग्राफी तज्ज्ञ नाही. मानधन तत्त्वावर आपण खासगी डॉक्टरांना दर बुधवारी बोलावत असतो; परंतु महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि त्या डॉक्टरांचा अपमानही करतात. यामुळे आपल्याकडे सोनोग्राफी तज्ज्ञ टिकतच नाही. जोपर्यंत कायमस्वरूपी सोनोग्राफीचे डॉक्टर येणार नाहीत; तोवर हा प्रश्न सुटणार नाही.’ - डॉ. हेमंतकुमार बोरसे, जिल्हा शल्यचिकित्सक.

(फोटो : हिंगोली जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीसाठी आलेल्या सुमारे 150 महिला ताटकळल्या. सोनोग्राफी तज्ज्ञच न आल्याने महिलांची कुचंबणा झाली)